वार्ताहर/ निपाणी
निपाणी परिसरातील ग्रामीण भागातील मांगूर येथे चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भितीच्या वातावरणात काहीसा दिलासा शुक्रवारच्या अहवालातून ग्रामीण भागाला मिळाला. आडी, सौंदलगा, जैनवाडी येथील कोरोनाची बाधा झालेल्या दोन गर्भवतींसह बाळंतीण कोरोनामुक्त झाल्या. पण निपाणीतील कोरोनाबाधित ‘त्या’ वृद्धेच्या 40 वर्षीय मुलग्याला व सोमवारी मयत झालेल्या युवकाच्या वडिलांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने दहशत कायम राहिली आहे. त्याचप्रमाणे आणखी एका महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला असून प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
आडी, सौंदलगा व जैनवाडी अशा तीन गावातील दोन गर्भवती व एका बाळंतिणीला कोरोनाची लागण झाल्याचे 11 रोजी स्पष्ट झाले होते. या दिवसांपासून या तिन्ही गावांसह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मांगूर येथील महिलेला कोरोनाबाधा होऊन मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर एक दहशत निर्माण झाली होती. प्रशासनाने खबरदारी घेताना गावे सीलडाऊन करत उपचार घेतलेले दवाखाने बंद करीत, संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन केले आहे.
निपाणीत अशोकनगर परिसरात राहणाऱया 85 वर्षीय महिलेला उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 15 रोजी त्या वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले होते. यामुळे निपाणीत भीती निर्माण झाली असतानाच, शुक्रवारी वृद्ध महिलेसोबत असणाऱया तिच्या 40 वर्षीय मुलाला तसेच सोमवारी बेळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या बादल प्लॉट येथील युवकाच्या वडिलांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. यामुळे ग्रामीण भागाला कोरोनामुक्त रुग्णांमुळे कांहीसा दिलासा मिळत असतानाच निपाणीत मात्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
म. गांधी रुग्णालयात अँटिजेन टेस्ट कोरोना रुग्णांसह क्वारंटाईनची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे संबंधितांची कोरोना टेस्ट व उपचारात विलंब लागत होता. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने निपाणीत अँटिजेन टेस्ट घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. शुक्रवारी सहा जणांची टेस्ट घेण्यात आली.