ग्रा. पं. स्तरावर कोरोना नियंत्रणासाठी समिती : गृहमंत्री बोम्माई यांची माहिती
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात ‘मायक्रो कंन्टेन्मेंट झोन’ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोना नियंत्रणासाठी स्थानिक अधिकाऱयांचा समावेश असणारी समिती नेमून अशा झोनवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली.
येथे पत्रकारांशी ते बोलत होते. मायक्रो कंन्टेन्मेंट झोनच्या टप्प्यातच कोरोनावर नियंत्रणासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. मायक्रो कंन्टेन्मेंट झोनमध्ये एक समिती नेमण्यात येईल. त्यामध्ये स्थानिक पोलीस, अधिकाऱयांचा समावेश असेल. कोरोनाबाधितांना औषधांचे वाटप करणे व कोरोनाचा प्रसार रोखण्याचे काम ही समिती करणार आहे. ग्रामीण भागात कठोर लॉकडाऊन जारी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाला दिली आहे. तहसीलदार व पीडीओंना जादा अधिकार देण्यात येतील. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाही मृतांची वाढती संख्या चिंताजनक आहे. मृत्यूचे प्रमाणा वाढण्यास कोरोनाची दुसरी लाटच कारणीभूत आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घेत कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
ब्लॅक फंगसबाबत सोमवारी केंद्रीयमंत्री सदानंदगौडा यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी 1 हजारहून अधिक इंजेक्शन पुरविण्याचे आश्वासन दिले आहे. मुलांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांना जिल्हय़ात विशेष वॉर्ड व आयसीयु बेडची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ब्लॅक फंगसवर नियंत्रणासाठीही विविध उपाययोजना केल्या जातील, असेही ते म्हणाले.
तहसीलदार, पीडिओंशी मुख्यमंत्री आज करणार चर्चा
मुख्यमंत्री येडियुराप्पा बुधवारी राज्यातील तहसीलदार, पीडीओ आणि ग्राम पंचायत पीडीओंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. यावेळी ते ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासंबंधी विशेष अधिकाराचा वापर आणि मायक्रो कंन्टेन्मेंट झोनसंबंधीच्या सूचना देण्याची शक्यता आहे.