5 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा : 5 कोटी महिला ठरणार लाभार्थी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रामीण महिलांना मोठी भेट दिली आहे. नववर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रामीण भागातील महिलांना 5 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून यानुसार ग्रामीण विकास मंत्रालयाने देशभरातील महिलांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
ग्रामीण भागातील अन् दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत प्रमाणित स्वयंसहाय्य समुहाशी संबंधित महिलांकरता ही सुविधा सुरू केली जात आहे. कुठल्याही आपत्कालीन स्थितीत ग्रामीण महिलांना बँकेतून 5 हजार रुपयांची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळणार आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा वापर करून महिला कुठल्याही क्षणी स्वतःच्या बँक खात्याद्वारे 5 हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढून घेऊ शकतात. सर्वसाधारणपणे अशाप्रकारची सुविधा बँकांकडून स्वतःच्या मोठय़ा ग्राहकांना देण्यात येते. परंतु आता गावांमधील महिलांना ही सुविधा मिळाल्याने त्यांना गरजेवेळी पैशांसाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत.
योजनेचा शुभारंभ
18 डिसेंबर रोजी दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत प्रमाणित महिला स्वयंसहाय्य गटाच्या सदस्यांसाठी 5 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा शुभारंभ करण्यात आल्याची माहिती ग्रामीण विकास विभागाचे सचिव नागेंद्रनाथ सिन्हा यांनी रविवारी दिली आहे. सरकारी बँका आणि राज्य ग्रामीण आजीविका मिशन या कार्यक्रमात भाग घेत आहे.
अर्थसंकल्पात घोषणेवर अंमलबजावणी
प्रमाणित स्वयंसहाय्य गटाच्या महिला सदस्यांना 5 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी 2019-20 च्या स्वतःच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. या घोषणेनुसार ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधीन असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशनने देशाच्या ग्रामीण भागांमध्ये महिला स्वयंसहाय्य गटाच्या सदस्यांना ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आपत्कालीन स्थितीत गरजा पूर्ण करण्यास मदत करणे हा यामागचा उद्देश आहे. एका अनुमानानुसार या योजनेंतर्गत 5 कोटी महिला ओव्हरड्राफ्ट सुविधेस पात्र ठरणार आहेत.