प्रतिनिधी/ बेळगाव
मंगळवारी होणाऱया ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी व्यापक बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील 55 ग्राम पंचायतींची निवडणूक मंगळवारी होणार असून मतपेटय़ा सीपीएड मैदानाजवळील वनिता विद्यालय येथे ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे क्लब रोडवर वाहतूक बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी सोमवारी या संबंधी आदेश जारी केला आहे. बेळगाव ग्रामीण, काकती, मारिहाळ, हिरेबागेवाडी, कॅम्प, एपीएमसी पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात ग्राम पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 25 सेक्टरमध्ये निवडणूक बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली असून मतदान केंद्रांवर अतिरिक्त बळ तैनात करण्यात आले आहे.
सीपीएड मैदानाजवळील वनिता विद्यालय येथे मतपेटय़ा ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगळवार दि. 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 पासून सर्व मतपेटय़ा या केंद्रावर पोहोचेपर्यंत क्लब रोडवर इतर वाहनांसाठी वाहतूक बंदी असणार आहे. चन्नम्मा सर्कलपासून हिंडलग्याकडे जाणारी सर्व वाहने प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयाकडून वळविण्यात आली असून महात्मा गांधी सर्कलमार्गे हिंडलग्याकडे जाता येणार आहे.
हिंडलगाहून चन्न्मा सर्कलकडे येणारी वाहनेही वरील मार्गाने वळविण्यात आली आहेत. क्लब रोडवर इतर वाहनांना बंदी असणार असून ही वाहने गांधी चौक, शौर्य चौक, देशपांडे खूट मार्गे बेळगाव शहरात वळविण्यात येणार आहेत. वाहन धारकांनी याची नोंद घेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.