दर वाढल्याने ग्राहकांचा कांदा खरेदीकडे कानाडोळा
वार्ताहर / कुंभोज
कुंभोजचा आठवडी बाजारात कांदाचे दर वाढल्याने कांदा खरेदीकडे ग्राहकांनी कानाडोळा केल्याचे चित्र आहे. बाजारपेठेत भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अंड्याचे दर वाढूनही परिसरात दररोज देशी अंड्यांना मोठी मागणी आहे.
कुंभोजचा बाजारपेठेत कांद्या व भाजाचे दर गगनाला भिडल्यामुळे स्वयंपाक घरातून कांदा, वांगी, गवार हळुहळु गायब होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी कोरोनावर औषधी असलेल्या अंड्यांच्या मागणीत दर वाढुनही मोठी वाढ आहे.
बाजारपेठेत कांदा ५० ते १०० रुपये किलो भावाने विकत घ्यावा लागत आहे. परिणामी वांगी १०० रुपये किलो, गवार १००, दोडका ८० रुपये, देशी अंडी १५ रुपये दराने विकले जात आहे. कांद्याबरोबरच पालेभाज्यांचे दर वाढल्याने आठवडी बाजारात ग्राहक कमी होत असून सध्या डाळी व देशी व बॉयलर अंड्यांना मागणी वाढली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर जवळ जवळ सहा ते सात महिन्यापासून हॉटेल व्यवसायावर बंदीची कुर्हाड कोसळली होती. त्यामुळे आता हॉटेलमध्ये कांद्याची जागा कोबी, वाळुक, टोमॅटो यांनी घेतली आहे. आता तर कांद्याबरोबर कोबीचेही भाव वाढलेले दिसत आहे. त्यामुळे कांदा खाणाऱ्या ग्राहकना दुधाची चव ताकावर भागवावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.