प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य विद्युत नियायक मंडळाने 1 नोव्हेंबरपासून राज्यभरात वीज बिलामध्ये प्रतियुनिट दरवाढ केली आहे. हेस्कॉमने प्रतियुनिट 1 रूपये 90 पैसे दरवाढ करण्याचा प्रस्ताव राज्यसरकारकडे पाठविला होता. परंतु राज्यसरकारने प्रति युनिट 40 पैशांची वाढ केली आहे. हे वाढील वीज बिल डिसेंबर महिन्याच्या बिलासोबत पाठविण्यात येत आहे. त्यामुळे या महिन्यात ग्राहकांना वाढीव वीज बिलाचा शॉक बसत आहे.
प्रतिवषी हेस्कॉमकडून 1 एप्रिलपासून बिलात दरवाढ करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनामुळे ही दरवाढ पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. परंतु उर्जा शुल्कात वाढ होत असल्याने दर वाढविणे गरजेचे असल्याचे कारण देत राज्यातील वीज वितरण कंपन्यांनी दरवाढ करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. याची दखल घेवून राज्यसरकारने प्रतियुनिट 40 पैसे दरवाढ करण्यास मंजूरी दिली होती. ही दरवाढ 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिन्यात वापरलेल्या वीजेचे बिल डिसेंबर देण्यात येते. 1 डिसेंबरपासून ग्राहकांना नव्या दराप्रमाणे बिल देण्यात येत आहे. मागील महिन्याच्या बिलापेक्षा या महिन्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन नंतर अद्याप व्यवसायांची घडी व्यवस्थीत बसलेली नसताना आता वाढीव वीज बिलाने नागरीक हैराण झाले आहे. हे वाढील बिल कसे भरायचे? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.