विजापुरातील मनगुळी रोड बीडीए कॉम्प्लेक्सनजीकची घटना : दुकानदार जखमी
वार्ताहर/ विजापूर
मनगुळी रोड येथील बीडीए कॉम्प्लेक्सनजीक बुधवारी रात्री 8.30 वा. एका ऑटोमोबाईल स्पेअरपार्ट दुकानदारांवर गोळीबाराची घटना घडली. पद्दू रूपसिंग राठोड (वय 32) रा. बाराकोंडीतांडा हे या घटनेत गोळी लागून जखमी झाले आहेत. अधिक उपचारासाठी त्यांना विजापूर येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. घटनास्थळी विजापूरचे जिल्हा पोलीसप्रमुख अनुप अगरवाल, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख राम अरसिद्दी आणि गोलघुमट पोलीस स्थानकाचे सीपीआय बसवराज मुकरतीहाळ यांनी भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा पोलीसप्रमुख अनुप अगरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार पद्दू राठोड यांच्या ऑटोमोबाईल स्पेअरपार्टच्या दुकानातून तुळशीराम हरिजन रा. विजापूर याने इनोक्हा कारचे काही स्पेअरपार्ट खरेदी केले होते. खरेदीनंतर त्या स्पेअरपार्टच्या किंमतीवरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने तुळशीराम हरिजन याने पद्दू राठोड यांच्यावर गोळय़ा झाडल्या. या घटनेनंतर तुळशीराम फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान गेल्या पंधरा दिवसात विजापुरात दुसऱयांदा गोळीबाराची घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. या घटनेची जलनगर पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.