ऍथेन्स
पश्चिमी ग्रिसच्या भागामध्ये समुद्रात एका बोटीला आग लागल्यानंतर अग्निशामक दल आणि मदतकार्य पथकातील कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेऊन बोटीतील 278 प्रवाशांची सहीसलामतपणे सुटका केली आहे. सदरच्या बोटीमध्ये दोन जण अजूनही अडकून पडले असून 11 जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. ग्रीस प्रशासनाने यासंदर्भात मदत कार्य वेगाने चालवले आहे. वायव्य ग्रिसच्या भागामध्ये मध्य समुद्रामध्ये आयोनियनजवळ एका प्रवाशांच्या बोटीला शुक्रवारी मधेच आग लागल्याने ग्रीस प्रशासनाच्या अग्नीशामक दलाची चांगलीच तारांबळ उडाली. सदरच्या बोटीवर तीनशेहून अधिक जण प्रवास करत होते अशी माहिती आहे. यापैकी 278 जणांना सहीसलामतपणे बाहेर काढण्यात आले आहे. दोन ट्रक ड्रायव्हर या बोटीमध्ये अडकून पडले असून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न होत आहेत. अग्निशामक विभागाने अडकलेल्या कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरचीही व्यवस्था केली होती. जखमींना जवळच्या कोरफू येथील इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी कोणीही गंभीर नसल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.