वाहन चालकांची गोची, पोलिसांनाही होणार त्रास
प्रतिनिधी / बेळगाव
चन्नम्मा सर्कल ते केएलई इस्पितळापर्यंत ग्रीनझोन जाहीर करून या मार्गावर वाहने अडविण्यात येत आहेत. पोलीस प्रशासनाच्या या निर्णयामुळे वाहन चालकांची गोची झाली. बुधवारी दिवसभर पोलिसांनाही या निर्णयाचा त्रास भोगावा लागला. आम्ही याच मार्गावरून जाणार आहे आम्हाला का सोडत नाही? असे अनेक जण विचारत पोलिसांबरोबर वाद घालताना दिसत होते.
चन्नम्मा सर्कल ते केएलई इस्पितळापर्यंत अनेक इस्पितळे आहेत. केवळ रुग्णांची ने-आण करण्यासाठी हा रस्ता खुला ठेवावा, या मार्गावरील इतर वाहतूक बंद करावी म्हणून ग्रीनझोन जाहीर करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱयांचे म्हणणे आहे. मात्र सध्या लॉकडाऊन आहे, रस्ते ओस पडले आहेत. अशा परिस्थितीतही हा मार्ग बंद करण्याचे प्रयोजन नव्हते.
सकाळी 6 ते 10 यावेळेत बाजारपेठेत येणाऱयांबरोबरच दिवसभर औषधे आणण्यासाठी जाणारे व दवाखान्यात जाणाऱयांसाठीही हा प्रमुख मार्ग आहे. याबरोबरच इतर जोड रस्तेही पोलिसांनी बंद केले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या या निर्णयाची सोयीपेक्षा गैरसोयच अधिक होत आहे. हा निर्णय कशासाठी घेतला, असा सवाल उपस्थित होत आहे.
उपलब्ध माहितीवरून सिव्हिल हॉस्पिटलच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला आहे. कारण योग्य उपचाराविना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्युमुखी पडणाऱया रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जनमाणसांत क्षोभ वाढत आहे. या संतापाचा उदेक होवू नये, याची काळजी घेण्यासाठी हा मार्गच बंद केल्याचे समजते. बुधवारी वादावादीचे प्रसंग वाढताच त्याचा पोलिसांनाही मनस्ताप झाला. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी चन्नम्मा सर्कलला भेट देऊन पाहणी केली.