वृत्त संस्था/ कानपूर
येथील ऐतिहासिक ग्रीनपार्क स्टेडियमवर यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामना खेळविला जाणार आहे. या सामन्यासाठी ग्रीनपार्क स्टेडियमवर पूर्वतयारीला प्रारंभ करण्यात आला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान तसेच दुसरी कसोटी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 3 ते 7 डिसेंबर दरम्यान खेळविली जाणार आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत हे दोन सामने राहतील. पहिल्या कसोटीसाठी ग्रीन पार्क स्टेडियम सुसज्ज करण्याच्या पूर्वतयारीला प्रारंभ करण्यात आल्याची माहिती या स्टेडियमच्या उप क्रीडासंचालका मुद्रिका पाठक यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत या मैदानावर कोरोना महामारीमुळे एकही सामना खेळविला गेला नाही. तब्बल पाच वर्षांनंतर कानपूरच्या शौकिनांना क्रिकेटचा आनंद लुटण्याची संधी उत्तर प्रदेश शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. कानपूरचे ग्रीनपार्क स्टेडियम भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील अविस्मणीय ठिकाण म्हणून ओळखले जाते. 1952 पासून या मैदानावरच्या बऱयाच आठवणी जपण्यासाठी विविध छायाचित्रे, आकर्षक करंडक आणि स्मृतीचिन्हे यांच्यासाठी म्युझियम स्थापन करण्यात आले आहेत. या म्युझियमचे उद्घाटन या आगामी कसोटी सामन्यावेळी केले जाणार आहे.
न्यूझीलंड संघाने आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले आहे. या स्पर्धेतील रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव करत प्रथमच टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा क्रिकेट संघ आता भारतात कसोटी आणि टी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल होणार आहे. उभय संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका आयोजित केली आहे. या मालिकेतील पहिला सामना 17 नोव्हेंबरला जयपूरमध्ये, दुसरा सामना 19 नोव्हेंबरला रांचीत तर तिसरा सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळविला जाणार आहे.