वृत्तसंस्था/ चेन्नई
फिडेच्या ऑनलाईन विश्व कॅडेट आणि युवा रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रॅण्डमास्टर डी.गुकेशने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. रविवारी रात्री झालेल्या 14 वर्षाखालील मुलांच्या खुल्या वयोगटातील लढतीत गुकेशने व्ही. प्रणवचा 2-1 अशा गुणांनी पराभव केला.
गेल्यावर्षी ग्रॅण्डमास्टर किताब मिळविणारा सर्वात तरूण बुद्धिबळपटू गुकेशने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत व्ही. प्रणवचा पहिल्या डावात पराभव करून 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर प्रणवने दुसरा डाव जिंकून गुकेशशी 1-1 अशी बरोबरी केली. गुकेशने काळय़ा मोहरा घेवून तिसऱया डावात प्रणववर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत भारताचा ग्रॅण्डमास्टर निहाल सरीन, मुलींच्या विभागात रक्षिता रवी आणि एम. राजकोवा यांनी आपल्या गटातून शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. मुलांच्या 18 वर्षाखालील वयोगटात निहाल सरीनने वेंगचा 1.5-0.5, मुलींच्या 16 वर्षाखालील वयोगटात रक्षिता रवीने हेर्नाझेचा 2-1 तर 10 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात राजकोवाने चेनचा 2-0 असा पराभव केला. मुलींच्या 18 वर्षाखालील गटात भारताच्या प्रियांका नुटाकी, 16 वर्षाखालील मुलांच्या गटात ज्योत्स्ना, मुलांच्या 14 वर्षाखालील वयोगटात आदित्य मित्तल, 14 वर्षाखालील मुलींच्या गटात सविता, 12 वर्षाखालील मुलींच्या गटात अनुपमा श्रीकुमार आणि 10 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रेया हिप्परगी यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.