बेंगळूर/प्रतिनिधी
पर्यावरणवादी म्हणून संपूर्ण जगभरात ओळख असलेल्या ग्रेटा थनबर्गने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका २१ वर्षाय पर्यावरणप्रेमी आणि विद्यार्थिनी असलेल्या दिशा रवि या तरुणीला अटक केलं आहे. तिच्या बेंगळुरातील घरातून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं असून, शेतकरी आंदोलनासंदर्भात असलेल्या टूलकिटमध्ये बदल केल्याचा तिच्यावर आरोप आहे. याप्रकरणी ४ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान टूलकिटसमोर आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. याच प्रकरणात पोलिसांनी दिशा रवि या तरुणीला ताब्यात घेतलं आहे. बेंगळूर मधील सोलदेवानापळ्ळी परिसरात ती वास्तव्याला असून, तिथेच पोलिसांनी तिला अटक केली. दिशावर शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या टूलकिटमध्ये बदल करून आणखी मुद्दे समाविष्ट केल्याचा आणि ती पुढे पाठवल्याचा आरोप आहे.
नवीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीनंतर दिल्लीत हिंसाचार झाला. त्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्याबरोबरच इंटरनेट सेवाही बंद केली होती. याप्रकरणी पॉपस्टार सिंगर रिहानाबरोबर पर्यावरण कार्यकर्ता असलेल्या ग्रेटा थनबर्गने ट्विट करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर ग्रेटाने एक टूलकिट ट्विट केली होती. जी नंतर डिलीट करण्यात आली.