सुरक्षा ताफ्यावरील हल्ल्यात 1 ठार, पोलिसांसह 24 जखमी
श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील अमिरा कादल बाजार येथे सुरक्षा दलाच्या जवानांसह सर्वसामान्य नागरिकांवर रविवारी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून शहरात अतिदक्षता अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेने रात्री उशिरापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली नव्हती.
श्रीनगर शहरातील हरी सिंग हायस्ट्रीट भागातील गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात जवानांच्या दिशेने हल्लेखोरांनी ग्रेनेडद्वारे हल्ला केला. हल्ल्यानंतर संशयित फरार झाले असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. रविवारी सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. ग्रेनेड हल्ल्यावेळी रस्त्यावर गर्दी असल्यामुळे जखमींची संख्या अधिक आहे. काही जण किरकोळ जखमी झाले असले तरी पाच-सहा जणांना गंभीर इजा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली. तसेच हल्ल्यात मृत झालेल्याची ओळख पटली असून त्याचे नाव मोहम्मद अस्लम मखदुमी (70) असे आहे. सदर इसम नौहट्टा भागातील रहिवासी असल्याचे पोलीस अधिकाऱयांनी सांगितले.
परिसरात नाकाबंदी
हल्ल्यानंतर हरी सिंग हायस्ट्रीट भागात नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध घेतला जात होता. मात्र, संशयित तपास यंत्रणांच्या हाती लागले नव्हते. तसेच हल्लेखोर शहराबाहेर पसार होऊ नयेत यासाठी सर्व तपासनाक्यांवर अतिरिक्त पोलीस यंत्रणा तैनात करून तपासणी केली जात होती.
राजकीय नेत्यांकडून हल्ल्याचा निषेध
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अन्य राजकीय पक्षांनीही वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या हल्ल्याबाबत संताप व्यक्त केला आहे. तसेच हल्लेखोरांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी योग्य पावले उचलावीत, अशी मागणीही विविध राजकीय नेत्यांनी केली आहे.