मनपा मागविणार निविदा : वापराबरोबर महसूल उत्पन्न वाढविण्याचा प्रस्ताव
प्रतिनिधी / बेळगाव
मुख्यमंत्री शहर विकास अनुदानातून विविध विकासकामांबरोबर उद्यान आणि खुल्या जागांवर ग्लास हाऊसची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या ग्लास हाऊसचा वापर होत नसल्याने धूळखात पडली आहेत. त्यामुळे ग्लास हाऊसचा वापर करण्याच्यादृष्टीने तसेच मनपाला महसूल मिळण्यासाठी ग्लास हाऊस भाडेतत्त्वावर देण्याकरिता निविदा मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहरातील विविध उद्यानांमध्ये ग्लास हाऊस उभारण्यात आले आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविण्यासाठी तसेच उद्यानात येणाऱया नागरिकांना सुविधा उपलब्ध करण्याच्यादृष्टीने ग्लास हाऊस निर्माण केले होते. ग्लास हाऊस निर्माण करून 4 ते 5 वर्षे उलटली. पण एकाही ग्लास हाऊसचा उपयोग होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः उत्तर विभागात मोठय़ा संख्येने ग्लास हाऊस उभारण्यात आले आहेत. याकरिता लाखो रुपये खर्च शहर विकास अनुदानातून करण्यात आले आहेत. पण कोणत्याच कार्यक्रमासाठी ग्लास हाऊसचा वापर होत नाही.
2019 च्या दरम्यान ग्लास हाऊस भाडेतत्त्वावर देण्यासाठी किंवा विविध कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. पण नागरिकांकडून कोणताच प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे ग्लास हाऊस धूळखात पडले आहेत. सदाशिवनगर, महांतेशनगर, श्रीनगर, कणबर्गी, हनुमाननगर अशा विविध ठिकाणी ग्लास हाऊस निर्माण करण्यात आले आहेत. सध्या ग्लास हाऊसची देखभाल केली जात नसल्याने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्लास हाऊसचा वापर करण्यासह महसूल उत्पन्नासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी घेतला आहे.
ग्लास हाऊस भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा काढण्याचा आदेश बुधवारी सायंकाळी मनपा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी दिला. त्यामुळे महसूल विभागाकडून ग्लास हाऊसची माहिती घेण्यासह सर्वेक्षण करण्यात येणार आहे.