प्रतिनिधी/ म्हापसा
कोलवाळ येथे असलेल्या ग्लेनमार्क कंपनीच्या कामगार वर्गांनी युनियन केल्याचे कारण पुढे करून या कंपनीमधील 20 कामगारांची अन्यत्र बदलीचा आदेश काढला आहे. या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी संबंधित कामगारांनी गेटसमोर निदर्शने करून कंपनी विरोधात घोषणा दिल्या.
ग्लेनमार्क कंपनी गेली 42 वर्षांपासून सुरू आहे. मात्र आतापर्यंत कामगारांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यांचे शोषण होते. कामगारांच्या वेतनाकडे लक्ष दिले जात नाही, म्हणून सर्व कामगार एकत्रित येऊन भारतीय संघ कामगार युनियन करण्याचा निर्णय घेतला व तशी माहिती 15 दिवसांपूर्वी कंपनीला दिली. सर्व प्रश्न चांगल्या हिताने सोडविण्यासाठी आम्ही पुढे आलो आहोत. कामगारांच्या बैठका घेऊन कामगार युनियन बनविले. युनियनने ती पूर्तता केली, मात्र लेबर अधिकाऱ्यांनी ते गुपित ठेवले व नंतर ज्या 40 कामगारांनी सह्या केल्या त्यांच्यावर दबाव आणून युनियन करू नये, यासाठी प्रयत्न केले. युनियनचा राजीनामा देण्यासाठी कंपनीने कामगारावर दबाव आणला. सिक्किम, नाशिक अन्य प्रांतात 21 लोकांच्या बदल्या केल्या, अशी तक्रार कामगारांनी केली असल्याचे राष्ट्रीय कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णाजी धुमाळ यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, कामगार मंत्र्यांना दिली माहिती!
मुख्यमंत्री, कामगारमंत्री तसेच सर्व अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. येथे 12 तास काम करून घेतात, वेतन देत नाही, अशी तक्रारी त्यात मांडल्या. बेकायदेशीर बदल्या त्वरित रद्द करा. आम्हाला शांतता हवी आहे. सर्व कामगारांना भेटून चर्चा करावी. युनियनला संमती द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
कामगारमंत्री बाबुश मोन्सेरात यांची भेट घेऊन माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनीही याकडे लक्ष घालून या कामगारांच्या बदल्या रद्द कराव्यात अशी मागणी गोवा फार्म मजुरसंघ अध्यक्ष कपिल मालकरी यांनी केली.
कामगारांची नेंदणी पूर्ण : कृष्णाजी पळ
कामगारांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे. त्याची माहिती या व्यवस्थापनाला मिळाली व 40 कामगारांच्या बदल्या काढण्यात आल्या. याबाबत केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना माहिती दिली असून एचआर गुप्ता यांच्याशी त्यांनी चर्चाही केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही याकडे लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत लेखी पत्र व्यवहार आम्ही करणार आहोत, अशी माहिती संघटित कामगार महासंघाचे अध्यक्ष कृष्णाजी पळ यांनी दिली.