मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
कोरोना महामारी संकटामुळे येत्या घटक राज्य दिनी कोणताही मोठा कार्यक्रम समारंभ होणार नसल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले असून तो ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्याचा सरकारचा विचार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी मंत्री, आमदारांकडून सूचना मागवल्या असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी विविध खात्याच्या सचिवांची बैठक घेतली आणि घटक राज्य दिन 30 मे रोजी असल्याने काय करता येईल, याविषयी चर्चा केली. ते म्हणाले की कोरोनावर आधारीत काहीतरी नवीन करता येणे किवा त्याबाबतचा शुभारंभ करणे अशा कल्पना सर्व खाते सचिवांना देण्यात आल्या असून त्यांनी काही कार्यक्रम सूचवल्यास तो ऑनलाईन स्तरावर करण्याची सूचना दिली आहे. कोणताही मोठा सोहळा कोरोना संकटामुळे करायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रम करण्याची सूचना सचिवांनी केल्यानंतर ती मानून घेण्यात आली, परंतु नेमका कार्यक्रम अद्यापही ठरला नसल्याचे सुत्रांनी सांगितले. बारावी परीक्षेबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचा खुलासा त्यांनी केला व लवकरच तो होईल, असे नमूद केले.