मौदे येथील दत्ताराम मोरे मृत्यूप्रकरणः आईने दिली दोघा संशयितांची नावे
प्रतिनिधी / वैभववाडी:
वैभववाडी तालुक्यातील मौदे येथील दत्ताराम परशुराम मोरे (34) याच्या मृत्यूप्रकरणाचा तपास वैभववाडी पोलिसांनी सुरू केला आहे. शुक्रवारी पोलिसांनी हेत शेवरी फाटा येथील घटनास्थळाची पाहणी केली. तेथे चिंचेच्या झाडाखाली दत्तारामचे मनगटी घडय़ाळ पोलिसांना सापडले. दत्तारामला मारहाण करणाऱया हेत शेवरी फाटा येथील दोघा संशयितांची नावे दत्तारामची आई सुमित्रा यांनी वैभववाडी पोलिसांना दिली असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरविली आहेत. दरम्यान, दत्ताराम याच्या मृत्यूची नोंद वैभववाडी पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
26 जानेवारीला सायंकाळी दत्ताराम हा आईला ‘केस कापायला जातो’ असे सांगून घरातून निघाला होता. 27 जानेवारीला सकाळी तो गंभीर जखमी अवस्थेत घरी परतला. आपल्याला हेत शेवरी फाटा येथे तिघांनी मारहाण करून उपळे खिंड येथे फेकून दिल्याचे त्याने आईला सांगितले होते. याची माहिती आई सुमित्रा यांनी वैभववाडी पोलिसांना दिली आहे. दरम्यान, सुमित्रा मोरे यांच्या जबाबानंतर वैभववाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दत्तात्रय बाकारे व त्यांच्या सहकाऱयांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला. ज्या ठिकाणी दत्तारामला मारहाण करून फेकून देण्यात आले होते, त्या ‘उपळे खिंड’ जागेची पोलिसांनी शुक्रवारी पाहणी केली. तेथे कोणतेही धागेदोरे पोलिसांना सापडले नाहीत. मात्र, जेथे मारहाण झाली, तेथील चिंचेच्या झाडाखाली दत्तारामचे मनगटी घडय़ाळ पोलिसांना सापडले.
शवविच्छेदन अहवालासाठी पोलीस कोल्हापुरात
दरम्यान, शुक्रवारी सीपीआर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक मुळये यांनी दत्तारामच्या मृत्यूबाबत दिलेल्या माहितीनुसार वैभववाडी पोलिसांनी दत्ताराम मोरे याच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. सीपीआर रुग्णालयाकडून गुरुवारी देण्यात आलेल्या प्राथमिक अहवालात दत्तारामचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे म्हटले होते. दत्तारामच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी बाकारे व सहकारी कोल्हापूरला गेले आहेत. दत्तारामचा शवविच्छेदन अहवाल व अन्य माहिती पोलीस मिळविणार आहेत.