दैत्य निवारिणी, कृष्णाबाईच्या दर्शनासाठी महिलांची गर्दी
वार्ताहर /कराड
गुरूवारी घरोघरी घटस्थापनेने नवरात्र उत्सवास मोठया उत्साहात सुरवात झाली. तर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी मोठया भक्तिभावाने कुंभारवाडय़ातून दुर्गा मूर्ती नेऊन प्रतिष्ठापना केली. कोरोना संकटामुळे गेले दीड वर्ष बंद असलेली मंदिरे गुरूवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर दर्शनासाठी खुली केल्याने कराडचे आराध्य दैवत श्री कृष्णाबाईसह दैत्यनिवारिणी व अन्य मंदिरात दर्शनासाठी महिला व भाविकांनी केली होती.
आदीशक्ती दुर्गादेवी व स्त्री शक्तीचा जागर होणाऱया नवरात्र उत्सवास गुरूवारपासून प्रारंभ झाल्याने सर्वत्र, आनंद, भक्तिमय व चैतन्यमय वातावरणाची निर्मिती झाली आहे. गेल्या दीड वर्षापासून असलेला कोरोना विळखा सैल झाल्याने लॉकडाऊनमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीच्या नवरात्र उत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.
गुरूवारी सकाळपासूनच येथील कुंभारवाडी, बालाजी मंदिरासमोरील मैदान व गजानन हौसिंग सोसायटी येथे दुर्गादेवीच्या मूर्ती नेण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मूर्ती नेण्यासाठी महिलाही मोठया संख्येने आल्या होत्या. महिलांनी कुंभारवाडयातच दुर्गा देवीच्या मूर्तीला साडी नेसवून साजशृंगार केला. मंडळाच्या महिला व कार्यकर्त्यांनी दुर्गामाता की जयच्या जयघोषात मूर्ती प्रतिष्ठापनेसाठे नेल्या. मोठया भक्तिभावाने दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
कोरोनामुळे गेली दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे गुरूवारी घटस्थापनेच्या मुहूर्तावर दर्शनासाठी खुली करण्यात आली. यामुळे भाविकांत आनंदोचे वातावरण आहे. ऐन नवरात्र उत्सवात मंदिरे खुली झाल्याने गुरूवारी पहिल्याच दिवशी कृष्णाबाई व दैत्यनिवारिणी देवीच्या मंदिरासह शहर व परिसरातील अन्य मंदिरात महिला व भाविकांनी गर्दी केली होती. गाभाऱया दर्शनासाठी एका वेळी एक किंवा दोघांनाच सोडण्यात येत आहे.