हरित न्यायालयाचीही दिशाभूल
सांगली / प्रतिनिधी
सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिकेला हरित न्यायालयाने घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी न्यायालयाच्या आदेशाने २०१७ मध्ये स्वंतत्र बँक खाते उघडून त्यात ४५ कोटी ६९ लाख रूपये पालिकेने ठेवले आहेत. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी व्याजासह ही रक्कम ५५ कोटी ९ लाख ४८ हजार १६५ रुपये असल्याचे पालिकेने माहिती अधिकारात सांगीतले आहे. मात्र प्रत्यक्षात या तारखेला बँक खात्यावर ७ कोटी ९५ लाख १५ हजार २४ रूपये शिल्लक असल्याचे दिसत आहे. महापालिकेने दिलेली माहिती व प्रत्यक्ष पासबुकातातील जमा रक्कम यात कोट्यवधी रूपयांची तफावत आहे. ही रक्कम कोठे गेली ? असा सवाल करत यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप कॉंग्रेसचे कार्यकर्ते रविंद्र वळवडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
वळवडे म्हणाले, हरित न्ययालयाने महापालिकेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याचे आदेश २०१७ मध्ये दिले आहे. हा प्रकल्प न राबवल्यास महापालिका बरखास्त करण्याचा इशाराही तेव्हा न्यायालयाने दिला. त्यामुळे तत्कालीन पदाधिकारी, प्रशासनाने या प्रकल्पासाठी तातडीने एजन्सी नेमुन प्रकल्प आराखडा तयार केला. हरित न्यालयाने या प्रकल्पासाठी लागणार रक्कम स्वतंत्र बँक खाते ( एस्को अकाउंट) उघडून त्यात ठेवण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकल्पाच्या अमंलबजावणीसाठी विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सांगली, मनपा आयुक्त, प्रदुषण मंडळाचे अधिकारी व वॉलचंद महाविद्यालयाचा प्रतिनिधींचा समावेश असलेली एक उच्चस्तरीय समिती नेमली. या समितीने दोन महिन्यातून एकदा बैठक घेऊन घनकचरा प्रकल्पाच्या अमलबजवाणीचा आढावा घेऊन हरित न्यायालयास या बैठकीचे इतिवृत्त सादर करायचे आहे. प्रत्यक्षात या समितीच्या २०१७ ते २०२२ पर्यंत केवळ आठ बैठका झाल्या आहेत.
समितीच्या या आठ बैठकांचे इतिवृत्त न्यायालयात सादर करण्यात आले आहे. मात्र या बोगस आकडेवारीचा समावेश असल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट होत आहे. या आठही बैठक ज्या ज्या दिवशी घेण्यात आल्या. या बैठकीच्या दिवशी एस्क्रो अकाऊंटवर दर्शवलेली डे बुक शिल्लक रक्कम, माहिती आधिकारात सांगीतलेली रक्कम व प्रत्यक्षा या दिवशी एस्क्रो अकाऊंडच्या पासबुकावरील डे बुक शिल्लक रक्कम या कोट्यवधींचा फरक आहे. महापालिकेने या बँक खात्यावर ५ जुलै २०१७ रोजी ४५ कोटी ६९ लाख रुपये ठेवले होते. या रकमेवर २६ नोव्हेंबर २०२१ पर्यंत १७ कोटी ३ लाख ५१ हजार २४३ रूपये व्याज मिळाले आहे. व्याजासह ही रक्कम ६२ कोटी ७२ लाख ५१ हजार २४३ रुपये होते. या रकमेतून ६ जुलै २०२१ अखेर ५ कोटी ८१ लाख २२ हजार ६५६ रुपये खर्च करण्यात आले आहे. या खात्यावर २७ नोव्हेंबर २०२१ रोजी शिल्लक ५५ कोटी ९ लाख ४८ हजार १६५ असल्याचे पालिकेने माहिती अधिकारात सांगीतले आहे. मात्र प्रत्यक्षात या तारखेला पासबुकावर ७ कोटी ९५ लाख १५ हजार २४ रुपयेच जमा आहेत. उर्वरीत कोट्यवधींची रक्कम कोठे गेली ? असा सवाल वळवडे यांनी उपस्थित केला आहे.