खासदार जोल्ले यांची कंत्राटदारांना सूचना ः निपाणीत घरकुल प्रकल्प उभारणीची पाहणी
वार्ताहर / निपाणी
निपाणी शहरातील प्रत्येक गरजूला घरकुल देण्याच्या उद्देशाने घरकुल प्रकल्प उभारला जात आहे. या घरकुल प्रकल्प उभारणीची पाहणी खासदार आण्णासाहेब जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले यांनी बुधवारी केली. यावेळी त्यांनी संबंधित कंत्राटदारांना घरकुल उभारणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. त्याचप्रमाणे कामात कोणतीही तडजोड नको, काम दर्जात्मक झाले पाहिजे, अशा सूचना दिल्या.
यावेळी बोलताना खासदार जोल्ले म्हणाले, निपाणी शहराच्या वैभवात भर टाकणारे हे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून निपाणी शहर व उपनगरातील एकही गरजू कुटुंब घरकुलापासून वंचित राहणार नाही. फ्लॅट पद्धतीने उभारली जाणारी ही घरकुले सर्व मूलभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देत उभारली जाणार आहेत. अशा या घरकुल प्रकल्पामुळे प्रत्येक गरजूला हक्काचा निवारा मिळणार आहे. त्याचबरोबर शहराला एक विशिष्ट असे स्वरूप प्राप्त होणार आहे, असे सांगितले
मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, हे घरकुल प्रकल्प केंद्र व राज्य शासनाच्या सहयोगातून आणि गरजू लाभार्थ्यांच्या योगदानातून उभारले जात आहे. बेळगाव जिल्हय़ात असा प्रकल्प प्रथमच उभारला जात असून हा निपाणीसाठी अभिमानच म्हणावा लागेल. उभारण्यात येणारे गृहप्रकल्प संबंधित कंत्राटदारांनी लवकरात लवकर पूर्ण करून गरजू लाभार्थ्यांना त्याचा ताबा मिळेल याची काळजी घ्यावी. गरजू लाभार्थ्यांनी अजूनही आपली अनामत रक्कम भरून यासाठी मागणी अर्ज करता येतो, असे सांगितले
यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती सद्दाम नगारजी, नगरसेवक राजू गुंदेशा, संतोष सांगावकर, विनायक वडे, आशा टवळे, अरुणा मुदकुडे, दिपाली गिरी, उपासना गारवे, सोनल कोठाडिया, प्रभावती सूर्यवंशी, उदय नाईक, शहर भाजपा अध्यक्ष प्रणव मानवी, एपीएमसी संचालक बंडा घोरपडे यांच्यासह नगरसेवक, भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.