सीपीएड मैदानावर आजपासून : एकाच छताखाली 170 हून अधिक स्टॉल्स : खाद्य पदार्थांसाठी वेगळे दालन : विविध स्पर्धांचेही आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव आयोजित, कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या सहकार्याने तऊण भारत पुरस्कृत ‘घरकुल 2022’ हे भव्य प्रदर्शन दि. 25 ते 30 नोव्हेंबरदरम्यान सीपीएड मैदानावर भरविण्यात येणार आहे. गृहनिर्माण क्षेत्रासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली मिळणाऱ्या या प्रदर्शनात 170 हून अधिक स्टॉल्स आहेत. त्याशिवाय खाद्य पदार्थांच्या स्टॉलचे वेगळे दालन आहे.
दि. 25 रोजी सायंकाळी 5 वाजता एमएलआयआरसीचे कमांडन्ट ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी निमंत्रीत म्हणून रोटरीचे प्रांतपाल व्यंकटेश देशपांडे, तऊण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, गोल्ड प्लस ग्लास इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक सुरेश त्यागी व धारवाड येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रमुख अभियंता शंकरगौडा पाटील उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनाला गोल्ड प्लस, अल्ट्राटेक सिमेंट व ‘जल जॉय ऑफ इंडिया’ यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. दि. 26 रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत ‘निसर्ग’ या विषयावर कोलाज तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 12 ते 18 व 18 वर्षांवरील अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. दि. 27 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत केशरचना (हेअर स्टाईल) स्पर्धा होणार आहे. यासाठी नैसर्गिक फुलांचा वापर करता येईल.
‘हेल्दी टिफीन बॉक्स’ (सकस टिफीन बॉक्स) स्पर्धा दि. 28 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत होईल. यासाठी मिलेट्सचा वापर करून पदार्थ तयार करावयाचा आहे. दि. 29 रोजी दुपारी 3.30 ते 4.30 या वेळेत पुष्परचना स्पर्धा होईल. यासाठी ‘डेकोरेटिंग फुड थाली’ ही थीम देण्यात आली आहे. यावेळी ताज्या व नैसर्गिक फुलांचा वापर करणे आवश्यक आहे.
दरम्यान, शनिवार दि. 26 रोजी सायंकाळी 6.30 वाजता वैयक्तिक व ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहेत. सदर स्पर्धा ‘बीएससी मॉल’ने पुरस्कृत केली आहे. त्यानंतर स्टॅन्डअप कॉमेडी होणार आहे. रविवार दि. 27 रोजी सायंकाळी 6.30 वाजता ‘हार्मनी वाद्यवृंद’चा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दि. 29 रोजी सायंकाळी 6.30 वाजता ‘तऊण भारत’ उर्जितातर्फे कार्यक्रम होणार आहे. अन्य दिवशी कराओके कार्यक्रम होईल.
आरोग्य तपासणी मोफत शिबिर
याच प्रदर्शनाच्या निमित्ताने राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खाते, जिल्हा सर्वेक्षणाधिकारी कार्यालय, जिल्हा असांसर्गिक रोग नियंत्रण विभाग यांच्यावतीने व तऊण भारत, इंजिनिअर्स असोसिएशन, रोटरी वेणुग्राम यांच्या सहकार्याने दि. 25 ते 30 नोव्हेंबरदरम्यान आरोग्य शिबिर होणार आहे. सीपीएड ग्राऊंडवर होणाऱ्या शिबिरामध्ये मधुमेह, रक्तदाब, कर्करोग (मुख, घसा, गर्भाशय व स्तनांचा कर्करोग) तसेच हृदयरोग याबद्दल मोफत तपासणी शिबिर होणार असून आयुष्मान कार्ड करून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी मोबाईलला लिंक केलेले आधार कार्ड घेऊन यावे, असे आवाहन आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने केले आहे.