प्रतिनिधी / मुंबई :
भारतात प्रत्येक घरात वापरण्यात येणाऱया घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी (कोटिंग) रसायनांचा वापर करण्यात येतो. या रसायनांचा मानवी शरिरावर वाईट परिणाम होऊन त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका वर्तवणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यावर नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीमध्ये त्याची गंभीर दखल घेत खंडपीठाने आवश्यक ते निर्णय घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने केद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाला दिले आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी वापरण्यात येणारे रसायन आरोग्यासाठी धोकादायक असल्याची बाब पलादिन पेंटस् आणि केमिकल्स कंपनीने जनहित याचिका दाखल करत न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी झिंक क्रोमेट वापरले जाते. झिंक क्रोमेटमध्ये मोठय़ा प्रमाणावर विषारी द्रव्य असून यामुळे मानवी शरीराला धोका निर्माण होऊन त्यातून कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो, असा दावा याचिकेतून कंपनीने केला होता. तसेच एलपीजी गॅस हे मूलभूत उत्पादन असून प्रत्येक घरात त्याचा सर्रास वापर होतो. त्यामुळेच हा धोका टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच घरगुती गॅस सिलिंडरच्या लेपनासाठी झिंक क्रोमेटचा वापर करण्यावर बंदी घालण्याची मागणी कंपनीने याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावर नुकतीच न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा याचिकेची गंभीर दखल घेत याचिकाकर्त्यांना याबाबत पेंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देत याचिकाकर्त्यांच्या या प्रस्तावावर आणि त्यामध्ये उपस्थित करण्यात आलेल्या संभाव्य धोक्यांबाबत तातडीने आवश्यक तो निर्णय घेण्याचे निर्देश पेंद्राला देत खंडपीठाने सुनावणी तहकूब केली.