वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने इंधन कंपन्यांनी घरगुती वापरच्या विनाअनुदानित सिलिंडरमध्ये 61.5 रुपये इतकी मोठी कपात केली आहे. इंडियन ऑईल कार्पोरेशनने याबाबतची घोषणा केली आहे.
दरकपातीचा हा निर्णय आजपासूनच लागू होणार आहे. याआधी 805.50 रुपयांना मिळणारा हा घरगुती वापराचा विनाअनुदानित सिलिंडर 744 रुपयांना मिळणार आहे. तर मुंबईमध्ये याची किमत 714.5 असेल. याशिवाय 19 किलो वजनाच्या व्यावसायिक वापराच्या सिलिंडरमध्येही दरकपात केली आहे. हे सिलिंडर आता 96 रुपये स्वस्त झाले आहेत. दिल्लीत याची किमत आता 1381.5 वरुन 1285.5 रुपये झाली आहेत. तर मुंबईमध्ये हा सिलिंडडर 1234.5 रुपयांना मिळणार आहे.
दरम्यान, रिफिल सिलिंडर बुकींगसाठी मात्र 15 दिवसांची अट कायम ठेवण्यात आली आहे. देशात सर्वच इंधन कंपन्यांकडे घरगुती वापराच्या सिलिंडरची कमतरता नाही. त्याचबरोबर सिलिंडर वितरण करणाऱया कर्मचाऱयाचा मृत्यु झाल्यास त्याच्या वारसांना 5 लाख रुपये देण्याचा निर्णयही करण्यात आला आहे. तर ग्राहकांनी विनाकारण नोंदणी करुन वितरकांच्या अडचणीत भर टाकू नये, असे आवाहन आयओसीचे अध्यक्ष संजयसिंह यांनी एका व्हीडिओ संदेशाद्वारे केले आहे.