व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 78 रुपये वाढ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
बाजारपेठेत कांदा, बटाटय़ासह भाज्यांच्या किमती कडाडल्या असताना सरकारी तेल कंपन्यांनी नोव्हेंबर महिन्यात एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतेही बदल केले नाहीत. सिलिंडरच्या किमती स्थिर असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, व्यावसायिक (कमर्शियल) सिलिंडरच्या दरात 78 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी असलेल्या आयओसीने संकेतस्थळावर सिलिंडरचे नवे दर प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये असलेले दर नोव्हेंबरमध्येही लागू असतील. मुंबई आणि दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 594 रुपये आहे. तर दिल्लीतही सिलिंडरचा दर 594 रुपये आहे. चेन्नईत मात्र सिलिंडरसाठी 610 रुपये मोजावे लागत आहेत. कोलकात्यात सिलिंडरचा दर 620 रुपये इतका आहे.
कमर्शियल सिलिंडर दरात वाढ
नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. चेन्नईत सिलिंडरच्या किमतीत सर्वाधिक 78 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सिलिंडरचा दर 1 हजार 354 वर गेला आहे. मुंबई आणि कोलकात्यात सिलिंडरचा दर 76 रुपयांनी वाढल्यामुळे येथे अनुक्रमे 1 हजार 189 रुपये आणि 1 हजार 296 रुपये मोजावे लागतील. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरचा दर 1 हजार 241 रुपये झाला आहे.
सिलिंडर डिलिव्हरीची बदलली पद्धत
नोव्हेंबर महिन्यापासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या घरपोच सेवेच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. सुरूवातीच्या काळात ही सिस्टम 100 मोठय़ा शहरांत लागू केली जाईल. ग्राहकांना एलपीजी सिलिंडरसाठी वन-टाईम पासवर्डची गरज असेल. तेल कंपन्या ही नवी सिस्टम लागू करणार आहेत. या नव्या पद्धतीला डिलिव्हरी ऑथेन्टिकेशन कोडच्या नावाने ओळखले जाईल.