आतापर्यत 21 कोटी 32 लाख घरपट्टी जमा
प्रतिनिधी/ बेळगाव
घरपट्टीवरील पाच टक्के सवलतीवरील मुदत वाढविण्यात आल्याने आतापर्यत 21 कोटी 32 लाखाचा महसुल मिळाला आहे. आक्टोबर अखेरपर्यत विनासवलत व विनादंड घरपट्टी भरून घेण्यात येणार आहे. मात्र नोव्हेबरपासून घरपट्टीवर प्रति महिना दोन टक्के दंडव्याज आकारण्यात येणार आहे. यामुळे विनादंडव्याज घरपट्टी भरण्यासाठी मालमत्ताधारकांना एक महिन्याचा अवधी शिल्लक राहिला आहे.
महापालिकेच्यावतीने चालू वर्षाचा कर एप्रिल महिन्यात भरुन घेतला जातो. तर जास्तीत जास्त नागरिकांनी मालमत्ता कर भरावा याकरिता पाच टक्के सवलत देण्यात येते. यामुळे किमान 25 ते 30 टक्के मालमत्ता धारक एप्रिल महिन्यात मालमत्ता कर भरतात. यंदा 2020-21 आर्थिक वर्षांत महसूल विभागाला कर वसुलीचे उद्दिष्ट गाठता आले नाही. कोरोनामुळे फेब्रुवारीपासून लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व व्यवसाय आणि कार्यालये बंद होती. त्यामुळे नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली होती. परिणामी घरपट्टी जमा झाली नाही. कोरोनामुळे चालू आर्थिक वर्षाचा कर एप्रिल महिन्यात भरुन 5 टक्के सवलतीचा फायदा असंख्य मालमत्ताधारक घेता आला नाही. त्यामुळे पाच टक्के सवलतीची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. कोरोनाच्या महामारीमुळे राज्य शासनाने पाच टक्के सवलतीच्या मुदत जूलै अखेरपर्यत वाढ केली होती. त्यामुळे त्या कालावधीत मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरणा केली. तसेच विनादंड घरपट्टी भरण्यासाठी ऑगस्ट, सप्टेबर आणि ऑक्टोबर असे तीन महिने मुदत देण्यात आली आहे.
यंदा 45 कोटी मालमत्ता कर वसूल करण्याचे उद्दिष्ट महापालिकेचे आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यात 10 कोटी रूपये मालमत्ता कर वसूल करण्यात आला होता. मात्र जुलै अखेरपर्यत पाच टक्के सवलत आणि ऑक्टोबर अखेरपर्यत विनादंड घरपट्टी भरण्याची मुभा देण्यात आल्याने कोरोनाच्या महामारीतदेखील शहरवासियांना घरपट्टी जमा केली आहे. त्यामुळे आतापर्यत 21 कोटी 32 लाख रूपये घरपट्टी जमा झाली आहे. पन्नास टक्के मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरणा केली आहे. नोव्हेबरपासून महिन्यापासून प्रति महिना 2टक्के दंड व्याज आकारण्यात येणार असून विनादंड व्याज घरपट्टी भरण्यासाठी मालमत्ताधराकांना एक महिन्याचा अवधी शिल्लक आहे. जर नोव्हेबर महिन्यात घरपट्टी भरणा केल्यास प्रति महिना दोन टक्के दंडाचा भूर्दंड घरपट्टीवर भरावा लागणार आहे.