प्रतिनिधी /बेळगाव
एप्रिल महिन्यात घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना पाच टक्के कर सवलत देण्यात येते. त्यामुळे एप्रिल महिन्यात कर भरण्यासाठी मालमत्ताधारकांची धावपळ असते, पण सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांना घरपट्टी भरण्यासाठी चलन उपलब्ध झाले नाही. परिणामी घरपट्टी भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना घरपट्टी न भरताच परतावे लागले.
2022-23 या आर्थिक वर्षाची घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना पाच टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी नागरिक मनपा कार्यालयात तसेच बेळगाव-वन कार्यालयात जात आहेत. पण त्याठिकाणी चलन मिळत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. सर्व्हर डाऊन असल्याने चलन जनरेट होत नसल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. परिणामी नागरिकांना घरपट्टी भरता आली नाही. पाच टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी महिना अखेर मालमत्ताधारकांची गर्दी होते. त्यामुळे बहुतांश मालमत्ताधारक महिन्याच्या प्रारंभी कर भरणा करीत असतात. पण सोमवारी घरपट्टी भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना चलन मिळाले नसल्याने घरपट्टी भरता आली नाही.
घरपट्टी वसूल करण्यासाठी मनपाला आटापिटा करावा लागतो. पण बहुतांश मालमत्ताधारक घरपट्टी भरण्यासाठी मनपा कार्यालयात येत असताना त्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अधिकाऱयांनी घरपट्टी जमा करण्यात निर्माण होणाऱया तांत्रिक अडचणीचे निवारण करण्याची मागणी होत आहे.