कर्नाटक वन कार्यालये आता सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत खुली
प्रतिनिधी /बेळगाव
उत्पन्न वाढीबरोबर महसूल वेळेत जमा व्हावा, याकरिता मनपाने 30 जूनपर्यंत घरपट्टी भरणाऱया ग्राहकांना पाच टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी कर्नाटक वन कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढत आहे. सोमवारी पाणीपट्टी, वीजबिल व घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शिवाय लॉकडाऊन काळात कर्नाटक वन बंद राहिल्याने सोमवारी नागरिकांनी गर्दी केली होती.
नागरिकांनी वेळेत घरपट्टी भरून मनपाला सहकार्य करावे, या उद्देशाने मनपाने चालू महिन्यात घरपट्टी भरणाऱया नागरिकांना सवलत दिली आहे. एकूण घरपट्टीच्या रकमेत पाच टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिक कर्नाटक वन कार्यालयामध्ये गर्दी करत आहेत. मनपाने दिलेल्या सवलतीमुळे मनपाच्या महसुलातही वाढ होणार आहे. शहरात असलेल्या गोवावेस, टीव्ही सेंटर, बिग बाजार आणि अशोकनगरमध्ये असलेल्या कर्नाटक वन कार्यालयात घरपट्टी भरण्यासाठी सोमवारी नागरिकांची वर्दळ वाढली. नागरिकांच्या सोयीखातर कर्नाटक वन कार्यालयाच्या वेळेत बदल करण्यात आला असून कार्यालये आता सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत खुली राहत आहेत.