प्रतिनिधी /बेळगाव
उत्पन्नवाढीबरोबर महसूल वेळेत जमा व्हावा, याकरिता मनपाने 30 एप्रिलपर्यंत घरपट्टी भरणाऱया ग्राहकांना पाच टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी कर्नाटक वन कार्यालयात नागरिकांची गर्दी वाढत आहे. शुक्रवारी पाणी, लाईट बिल व घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गत दोन वर्षात कोरोनामुळे घरपट्टी आणि करभरणा थांबल्याने मनपाच्या महसुलावर परिणाम झाला आहे. मात्र आता मनपाने घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांना सवलत दिली आहे. त्यामुळे सवलतीचा फायदा घेत घरपट्टी भरणाऱया मालमत्ताधारकांची संख्या वाढली आहे.
नागरिकांनी वेळेत घरपट्टी भरून मनपाला सहकार्य करावे, या उद्देशाने मनपाने चालू महिन्यात घरपट्टी भरणाऱया नागरिकांना सवलत दिली आहे. एकूण घरपट्टीच्या रकमेत पाच टक्के सवलत दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी नागरिक कर्नाटक वन कार्यालयामध्ये जात आहेत. मनपाने दिलेल्या सवलतीमुळे मनपाच्या महसुलातही वाढ होणार आहे. शहरात असलेल्या गोवावेस, टीव्ही सेंटर, बिगबाजार आणि अशोकनगरमध्ये असलेल्या कर्नाटक वन कार्यालयात घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे.