प्रतिनिधी / बेळगाव
घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेने वसुली मोहीम राबविण्यासाठी महसूल निरीक्षकांची 9 पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, सदर महसूल निरीक्षकांना मतदार यादी करण्याचे काम सोपविण्यात आल्याने घरपट्टी वसुलीचे काम रखडले आहे. त्यामुळे महापालिकेचे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
महापालिकेने यंदा 45 कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापैकी 32 कोटी घरपट्टी वसूल केली असून, उर्वरित घरपट्टी वसूल करण्यासाठी 2 महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या महसूल विभागाने महसूल निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली 9 पथके स्थापन केली आहेत. सदर पथकांमध्ये महसूल निरीक्षक, वॉर्ड क्लार्क आदींचा समावेश करण्यात आला आहे. घरपट्टी भरणा न केलेल्या मालमत्ताधारकांच्या घरोघरी जाऊन चलन देणे तसेच घरपट्टी वसूल करण्याची सूचना केली आहे. त्याप्रमाणे थकबाकीदारांकडे महसूल वसुलीची सूचनाही केली आहे. 10 हजारहून अधिक घरपट्टी थकबाकी असल्यास कायदेशीर कारवाईचा आदेश आयुक्तांनी बजावला आहे. त्यामुळे सदर मोहीम राबविण्याची जबाबदारी महसूल निरीक्षकांवर सोपविली आहे. मात्र, अद्याप ही मोहीम राबविण्यास मनपा महसूल विभागाला मुहूर्त मिळाला नाही. मतदार यादी तयार करणे, मतदान केंद्रांची चाचपणी करून अहवाल देण्याची जबाबदारी महसूल निरीक्षकांवर सोपविली आहे. त्यामुळे महसूल वसुलीचा मुद्दा बाजूला पडला आहे. नियुक्त केलेली पथके मतदार यादी चाचपणीसाठी धावपळ करीत असल्याने घरपट्टी वसुलीचे काम रखडले आहे. त्यामुळे उर्वरित उद्दिष्टपूर्ती वेळेत पूर्ण होणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.