नवी दिल्ली / वृत्तसंस्था
येत्या काही दिवसात एलपीजी सिलिंडर ओटीपीशिवाय उपलब्ध होणार नाही. आता आपल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या घरपोच सेवेची प्रक्रिया बदलली जाणार आहे. 1 नोव्हेंबरपासून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या नवीन प्रणालीला ‘डीएसी’ म्हणजे डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड असे नाव देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात 100 स्मार्ट सिटींमध्ये ही प्रणाली लागू केली जाईल. त्यानंतर हळूहळू इतर शहरांमध्ये अंमलबजावणी होताच देशभरात ही कार्यपद्धती वापरली जाणार आहे. सध्या जयपूरमध्ये याचा पायलट प्रकल्प सुरू आहे.
घरगुती गॅस सिलिंडर ‘मिस्ड कॉल’द्वारे बुक करण्याच्या प्रणालीला अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी भक्कम पाऊल उचलले आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार केल्या जाण्याच्या अनेक घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत. सिलिंडरची जादा दराने विक्री करून वितरक पैसे कमावतात. हे रोखण्यासाठी आता गॅस वितरण पारदर्शक करण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
ग्राहकांना सिलिंडर घरपोच हवा असल्यास नव्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे. या नव्या नियमानुसार गॅस वितरकाकडे तुमची अद्ययावत माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा ग्राहकांना सिलिंडर घरपोच मिळणार नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार, तेल कंपन्या चोरी रोखण्यासाठी आणि योग्य ग्राहक ओळखण्यासाठी एलपीजी सिलिंडरची नवीन वितरण प्रणाली लागू करणार आहेत. आता पुढील महिन्यापासून एलपीजी सिलिंडर्सच्या होम डिलिव्हरीची व्यवस्था बदलत आहे. या प्रणालीनुसार, येत्या काही दिवसांत ग्राहकाच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे आलेल्या ‘ओटीपी’ नंबरशिवाय एलपीजी सिलिंडर उपलब्ध होणार नाही.
घरपोच सेवा पद्धती…
आता फोनवर एलपीजी सिलिंडर नोंदणी केल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक कोड (ओटीपी नंबर) येईल. हा कोड डिलिव्हरी बॉयला द्यावा लागेल. कोड न दिल्यास, सिलिंडर सापडणार नाही. कोड सांगितल्यावरच सिलिंडर मिळू शकेल. ही व्यवस्था केवळ घरगुती सिलिंडर्सवर लागू होणार असून व्यावसायिक सिलिंडर्ससाठी हा नियम असणार नाही.
कागदपत्रांचे अद्ययावतीकरण आवश्यक
गॅस वितरकाकडे ग्राहकाचा जुना मोबाईल नंबर प्रविष्ट असल्यास घरपोच सेवेमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. ही समस्या दूर करण्यासाठी डिलिव्हरी बॉयकडे असलेल्या ऍपद्वारे ग्राहकाला आपला मोबाईल नंबर अपडेट करता येईल. नंबर अपडेट होताच आलेल्या ओटीपीच्या सहाय्याने ग्राहक घरपोच सिलिंडरचा लाभ घेऊ शकेल. तसेच अन्य काही अडचणी असल्यास ग्राहकांना त्यासंबंधीची कागदपत्रे निर्धारित वेळेत वितरक कंपनीच्या कार्यालयात जमा करावी लागणार आहेत.