शहरातील दहा घरफोड्या उघडकीस : तीन लाख 63 हजाराचा मुद्देमाल जप्त : टोळीतील सर्व सदस्य रेकॉर्डवरील गुन्हेगार
प्रतिनिधी / सांगली
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने घरफोडी करणारी टोळी जेरबंद केली आहे. या टोळीकडून दहा गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीकडून तीन लाख 63 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले चारही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अतिरेकी उर्फ आकाश श्रीकांत खांडेकर वय 22, रा. राणाप्रताप चौक सांगलीवाडी, अक्षय धनंजय पोतदार वय 20 रा. पाण्याच्या टाकीजवळ मालगाव रोड सुभाषनगर मिरज, विजय संजय पोतदार वय 23, रामकृष्णनगर इगल लाईट हाऊसजवळ कुपवाड आणि रोहित गणेश कोळी वय 20 रा. हरीपूर रोड विनायक पार्क, साईमंदिराजवळ सांगली अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
या चारही आरोपींनी गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत या दहा घरफोड्या केल्या आहेत. यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, मोबाईल, तसेच भांडी व रग्नोख रक्कम याची चोरी केली आहे. त्याच्याकडून तीन लाख 63 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीराज फडणीस, व त्यांच्या पथकाने केली आहे.