हणजूणसह साळगाव येथे घरफोडी
प्रतिनिधी/ म्हापसा
हणजूण येथील प्रसिद्ध डिस्को क्लबच्या मालकाच्या घरात तसेच साळगाव येथे एकाठिकाणी घरफोडीचे प्रकरण तीन महिन्यापूर्वी घडले होते. यामध्ये दागिन्यांसह 15 लाखांचा ऐवज लंपास करून चोरटे फरार झाले होते. या प्रकरणातील 5 संशयित चोरटय़ांना पकडण्यात हणजूण पोलिसांना अखेर यश आले. हे चोरटे बिहार आणि पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहेत. दिल्ली व महाराष्ट्र येथे सापळा रचून पोलिसांनी संशयित चोरटय़ांच्या मुसक्या आवळल्या. या कामगिरीबद्दल पोलीस महानिरीक्षकांनी या पोलीस पथकाला बक्षीस जाहीर केले आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक सोबीत सक्सेना यांनी हणजूण पोलीस स्थानकात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
स्थानिक नागरिकांची मदत घेऊन ही चोरी केल्याचे पोलिसांना चौकशीत उघड झाले होते. त्यावरून चोरीतील मुख्य सूत्रधार परम उपेंद्र चोडणकर(वय 23 रा. आसगाव) याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी हिसका दाखविल्यानंतर त्याने चोरीची कबुली देत या चोरीप्रकरणी सर्व माहिती पोलिसांना दिली. त्या डिस्को क्लबच्या घरात चोरी करतेवेळी संशयित आरोपी फोनवर केलेल्या संभाषणाचा आधार घेत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पोलीस ओरोपीपर्यंत पोचू शकले, अशी माहिती यावेळी पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिली.
पूर्वनियोजित कट
पूर्वनियोजित कट रचून मुख्य संशयिताने आपल्या इतर मित्रांच्या साहाय्याने ही चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या डिस्को मालकाच्या घरी संशयित बेकरीमॅन म्हणून काम करत होता. दरम्यान, अटक केलेल्या संशयित चोरटय़ांची सध्या हणजूण पोलीस स्थानकाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली असून उत्तर गोवा पोलीस अधीक्षक सोबीत सक्सेना व म्हापशाचे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
एक घरफोडी पचल्याने दुसऱया घराकडे मोर्चा वळविला
केरीवाडी शिवोली येथील एका नामांकित म्युझिक क्लबच्या शेजारी असलेल्या बंद घराची अनेक दिवस माहिती घेऊन मध्यम बांधा असलेल्या परप्रांतीय व्यक्तीने 15 मे रोजी घराच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केला व घरातील सोने, चांदी, प्लॅटिनम, विदेशी सनग्लासेस तसेच 3000 विदेशी युरो चलन मिळून अंदाजे 15 लाख 12 हजार रुपयांची दिवसाढवळय़ा चोरी करून पळ काढला. या चोरीप्रकरणानंतर आत्मविश्वास वाढलेल्या संशयित चोरटय़ांकडून दुसऱयाच दिवशी 16 मे रोजी साळगाव येथे परिसरात पाळत ठेवत अन्य एका बंद घर फोडून करून हजारोंचा माल लंपास केल्याची माहिती उत्तर गोवा पोलीस अधीक्षक सोबीत सक्सेना यांनी यावेळी दिली.
दरम्यान, या घरफोडी प्रकरणांची रितसर तक्रार हणजूण तसेच साळगाव पोलिसात दाखल होताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञान तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तसेच नियोजनबद्ध सापळा रचून संशयितांना महाराष्ट्र तसेच दिल्ली येथून अखेर ताब्यात घेण्यात यश मिळविले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीमध्ये मिथुन कुमार परिहार(30), अरुणकुमार भद्री(22) सध्या रा. आसगाव-बार्देश, सुंदर फजलू खान(21), शेख राजू(21) सर्व आरोपी मूळ बिहार, जिल्हा कटिहार येथील आहेत.
या धाडसी कारवाईत उत्तर गोवा पोलीस अधीक्षक सोबीत सक्सेना म्हापसा उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हणजूणचे पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर, विराज कोरगावकर, धीरज देवीदास, तेजसकुमार नाईक, महिला उपनिरीक्षक स्नेहा सावळ, साहाय्यक निरीक्षक मोहन परब, हवालदार अनिल पिळगावकर, शिपाई महेंद्र मांद्रेकर, रुपेश आजगावकर, मयूर घाडी, राहुल आंगोलकर, (साळगाव पोलीस स्थानक) निकीतेश नाईक, श्रीकृष्ण रेडकर, स्नेहल मलीक, रामदास हमरलकर यांचा समावेश आहे.
उपनिरीक्षक अतिकेष खेडेकर यांचे अधीक्षकांकडून कौतुक
दरम्यान या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक अतिकेष खेडेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून सीसीटीव्ही पॅमेराच्या साहाय्याने उपलब्ध ^झालेल्या छायाचित्रानुसार संबंधित चोरटय़ापर्यंत पोचून त्यांना ताब्यात घेण्याची कौतुकास्पद कामगिरी बजावली. याची दखल घेत अधीक्षक सोबीत सक्सेना व उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी उपनिरीक्षक खेडेकर यांच्यासह पोलीस पथकाचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.