आपल्या जीवनात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा उपयोग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रवास असो किंवा कार्यालय या इलेक्ट्रॉनिक साधनांशिवाय आपले भागत नाही. मात्र, या साधनांच्या चार्जिंगची समस्या नेहमी जाणवते. छोटय़ा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंगसाठी नॅनोजनरेटरची निर्मिती आयआयटी दिल्लीत करण्यात आली आहे. हा जनरेटर पाण्याच्या थेंबांचे रूपांतर विजेत करण्यात सक्षम आहे. वीजनिर्मिती बरोबरच वीज साठवून ठेवण्याची त्याची क्षमता आहे. या साठवलेल्या विजेतून छोटय़ा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे चार्जिंग केले जाऊ शकते.
आयआयटी दिल्लीच्या भौतिक विभागाचे प्रमुख प्रा. निरज खरे यांच्या पुढाकाराने हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पावसाच्या पाण्याचे थेंब, साध्या पाण्याची वाफ इत्यादीपासून वीजनिर्मिती करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. तसे पाहिल्यास हे तंत्रज्ञान नवे नाही. तथापि, अशातऱहेने निर्माण झालेली वीज साठवून ठेवण्याची क्षमता आजवर साध्य करता आली नव्हती. ती या नॅनोजनरेटरमुळे प्रत्यक्षात उतरली आहे. ट्रायबो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन या दोन प्रक्रियांच्या संयोगाने नॅनोजनरेटर वीजनिर्मिती करतो. हे तंत्रज्ञान सोपे आणि सुलभ आहे. नॅनोजनरेटर सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक गणित व्यवस्थित जमल्यास हे उपकरण लोकप्रिय होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.