ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना पासून वाचण्यासाठी होम क्वारंटाईन व हॉस्पिटल क्वारंटाईन हे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाने हॉस्पिटल क्वारंटाईन होण्यापेक्षा लोकांनी स्वतःहून होम क्वारंटाईन व्हावे आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुन्हा केले.
तसेच जे घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटल मध्ये दिसतील असा इशारा ही त्यांनी यावेळी दिली. तसेच अनेकवेळा सांगून सुद्धा काही लोक लॉक डाऊन मध्ये बाहेर फिरत आहेत. सरकारने दिलेले आदेश मोडत आहेत, त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. याची दखल घेत जे नियम मोडतील त्यांना तुरुंगवासाची हवा खावी लागेल, आणि त्याची काल पासून सुरुवात झाली आहे, असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याच बरोबर राज्यसरकारने आवाहन करून सुद्धा काही खाजगी दवाखाने अजूनही बंद ठेवण्यात आले आहेत. असे दवाखाने, हॉस्पिटल यांच्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही पवार यांनी यावेळी सांगितले.