विहिरीतून विचित्र गोष्टी हस्तगत
जमिनीच्या आतील रहस्य कुणीच जाणू शकत नाही. पण एका घरात एक व्यक्ती आराम करत असताना त्याची नजर अचानक फरशीत झालेल्या बदलांवर पडली. या ठिकाणी खोदकाम केले असता या व्यक्तीला स्वतःच्या घरात 500 वर्षे जुनी विहिर दिसून आली आहे. या विहिरीतून विचित्र गोष्टी त्याला सापडल्या आहेत.
इंग्लंडच्या प्लायमाउथमध्ये राहणाऱया 70 वर्षीय कॉलिन स्टीयर यांनी स्वतःच्या घरात इतकी खोल विहिर असल्याची कल्पनाच नव्हती. त्यांचे हे घर 1895 सालच्या आसपास उभारण्यात आले होते. तर 1988 मध्ये ते या घरात राहण्यास आले होते.
घराच्या सजावटीचे काम करत असताना त्यांना खिडकीनजीक फरशी खाली दाबली गेल्याचे त्यांना दिसून आले. अधिक निरीक्षण केले असता त्यांना तेथे मोठा खड्डा पडल्याचे वाटल्याने त्यांनी तेथील फरशी हटविण्याचा निर्णय घेतला असता ही विहिर आढळून आली आहे. विहिरीतून त्यांना कित्येक शतके जुनी तलवार, नाणी आणि अंगठी सापडली आहे. विहिरीतून मिळालेल्या वस्तू पाहता ही विहिर 500 वर्षे जुनी असावी असे उद्गार कॉलिन यांनी काढले आहेत.
विहिर सुमारे 17 फूट खोल आणि सुमारे 4-5 फूट रुंद आहे. सुमारे 5 फूटांपर्यंत खोदकाम केले असता विहिरीत जुनी तलवार सापडली, त्यानंतर 1725 मधील एक नाणेही सापडले आहे. याचबरोबर विहिरीतून एक अंगठी मिळाल्याचे कॉलिन यांनी म्हटले आहे.
आम्ही जुने नकाशे पाहिले आणि या विहिरीच्या उत्पत्तीचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, पण यासंबंधी अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पण विहिरीचा विशाल आकार पाहता तिचा वापर प्राण्यांसाठी किंवा दोन-तीन कुटुंबांसाठी केला जात असावा असे कॉलिन म्हणाले.