घरपट्टी वसुली मोहीम तीव्रपणे राबविण्याचा महसूल निरीक्षकांना आदेश
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे महापालिकेच्या महसूल वसुलीवर परिणाम झाला आहे. घरपट्टीसह भू-भाडे वसुलीसाठी आवश्यक कार्यवाही करावी, घरांवर लावण्यात येणाऱया होर्डिंगचा शुल्क वसूल करण्यात यावा, अशा विविध सूचना महापालिका आयुक्तांनी महसूल विभागाच्या अधिकाऱयांना व निरीक्षकांना बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीवेळी केल्या.
महापालिकेकडे निधी नसल्याने विकासकामे राबविणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे महसूल वसुली थंडावली आहे. सध्या सर्व व्यवहार सुरळीत असतानादेखील महापालिकेची महसूल वसुली झाली नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी बुधवारी अधिकाऱयांची बैठक घेऊन घरपट्टी वसुली का झाली नाही? असा जाब विचारला. जून महिन्यापासून सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. घरपट्टी वसुलीसाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. पण महसूल निरीक्षकांचे प्रयत्न अपुरे पडत असल्याची टीका आयुक्तांनी केली. यंदा 45 कोटी रुपये घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे. पण यापैकी आतापर्यंत केवळ 21 कोटी जमा झाले आहेत. त्यामुळे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी घरपट्टी वसुली मोहीम तीव्रपणे राबविण्याची सूचना महसूल निरीक्षकांना केली.
लीजवर देण्यात आलेल्या खुल्या जागा व गाळय़ांच्या माध्यमातून महापालिकेला किती महसूल येतो याचा आढावा घेतला. लीजची मुदत संपुष्टात आलेल्या लीजधारकांची माहिती बैठकीवेळी घेतली. लीज संपलेल्या लीजधारकांना नोटीस बजावली आहे का? याचा आढावा घेऊन पुढील कारवाई करण्याचा आदेश दिला.
शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्स, बॅनर्स लावण्यात येतात. होर्डिंग्स लावण्यासाठी महापालिकेकडून कंत्राट देण्यात येते. कंत्राटाची मुदत संपुष्टात आल्याने सध्या कंत्राटदार नियुक्त करण्यात आला नाही. तरीदेखील शहरात ठिकठिकाणी अनधिकृतरीत्या जाहिरात फलक लावण्यात येत आहेत. सदर जाहिरात फलक हटविण्याचा आदेश आयुक्तांनी दिला. व्यावसायिक व सर्वसामान्यांचे फलक हटविण्यात येतात. मात्र, राजकीय व्यक्तींचे जाहिरात फलक हटविले जात नाहीत. त्यामुळे याचा जाब महापालिका आयुक्तांनी महसूल विभागाच्या अधिकाऱयांना विचारला. यापुढे ही कारवाई काटेकोरपणे करण्यात यावी. शहरातील सरसकट जाहिरात फलक हटविण्यात यावेत, असा आदेश आयुक्तांनी बजावला. सध्या कंत्राटदार नसल्याने घरांवर लावण्यात येणाऱया जाहिरात फलकांचा शुल्क महापालिकेला मिळत नाही. त्यामुळे घरांवर लावण्यात येणाऱया जाहिरात फलकांचा महसूल वसूल करण्याची सूचना महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी निरीक्षकांना केली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून महसूल वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असा आदेश बजावला. बैठकीला महसूल अधिकारी, साहाय्यक महसूल अधिकारी, महसूल निरीक्षक उपस्थित होते.