शहर परिसरात नऊ महिन्यांत किमती कारचे दोनवेळा नुकसान
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहर व परिसरात गुन्हेगार व समाजकंटकांचा उपद्रव वाढला आहे. शनिवारी भरदिवसा एकाकी वृद्धा रहात असलेल्या घरात घुसून तिचा गळा दाबून तिच्या अंगावरील आठ तोळय़ांचे दागिने लांबविण्यात आले. तर एसपीएम रोडवर घरासमोर उभी करण्यात आलेल्या कारवर ऍसिड फेकल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. केवळ नऊ महिन्यांत याच घरासमोरील दोन कारवर हल्ला करण्यात आला आहे.
गुन्हेगारांच्या उपद्रवामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. एसपीएम रोडवरील उद्योजक नितीन अशोक म्हाडगूत यांच्या नव्या कारवर ऍसिड फेकण्यात आले आहे. दसऱयाला त्यांनी ही कार घेतली होती. केए 22, एमसी 9875 क्रमांकाची नेक्सॉन कार शनिवारी रात्री त्यांनी आपल्या घरासमोर उभी केली होती. रविवारी सकाळी कारवर ऍसिड फेकल्याची घटना उघडकीस आली आहे.
नितीन म्हाडगूत यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. या घटनेत सुमारे 3 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. नितीन व त्यांचे कुटुंबीयांनी रविवारी जेव्हा ही घटना पाहिली, तेव्हा कारवर टाकलेले ऍसिड कारला जाळून काढत होते. घटनेची माहिती समजताच खडेबाजारचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.
अज्ञातांनी कारचे बोनेट, समोरील काच, दरवाजे, बंपर, पाठीमागील डिक्कीचा दरवाजा, टप, व्हिलकॅप आदींवर ऍसिड फेकले आहे. हे कृत्य कोणी केले, याचा उलगडा झाला नाही. खडेबाजाराचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जानेवारीतही हल्ला
2 जानेवारी 2022 रोजी नितीन यांनी आपल्या घरासमोर उभी केलेल्या केए 22, एमबी 0051 क्रमांकाच्या कारवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या होत्या. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला होता. नितीन यांची पत्नी निधी यांनी खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले होते. पहिल्या घटनेचा तपास लागला नाही, तोच नऊ महिन्यात कारवर हल्ल्याची दुसरी घटना घडली आहे. यापूर्वी अनेकवेळा पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन या घटनेचा तपास करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती.