छत्रपती शाहू महाराज यांचे करवीरवासियांना आवाहन : कोरोनाच्या काळात आरोग्य आणि दक्षता महत्वाची
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनामुळे निर्माण झालेल्या असाधारण परिस्थितीमुळे यंदाचा शाही दसरा रद्द करण्यात आला आहे. पुढच्या वर्षी आपण शाही दसरा साजरा करू शकतो, पण यावर्षी मात्र तमाम करवीरवासियांचे आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पालन करत दक्षता घ्या. घरीच दसरा साजरा करून आनंद लुटा, असे आवाहन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी केले आहे.
कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला संस्थानकाळापासूनची मोठी परंपरा आहे. काही अपवादात्मक स्थिती वगळता ही परंपरा अखंडीत सुरू आहे. यंदा कोरोनामुळे स्वतः शाहू महाराजांनी जनआरोग्याची व्यापक भूमिका घेत शाही दसरा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ऐतिहासिक दसरा चौकात दरवर्षी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत होणारा शाही दसरा, सिमोलंघनाचा सोहळा होणार नाही. करवीरवासियांना यंदा छत्रपती घराण्यातील सदस्यांना शुभेच्छा देता येणार नाहीत, दसऱयाचे सोने दसरा चौकात लुटता येणार नाही.
या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शाहू महाराज यांनी `तरुण भारत’शी साधलेल्या संवादात आपल्या भावना मांडल्या.
ते म्हणाले, प्लेगच्या साथीमुळे शंभर वर्षापूर्वी शाही दसरा रद्द करण्यात आल्याचे संदर्भ आहेत. त्या काळीही जनतेच्या आरोग्याला, जीविताला प्राधान्य देत दसऱ्याच्या सोहळा रद्द केला होता. त्यानंतर आपण शाही दसरा साजरा करत आलो आहोत. यंदा प्रथमच खंड पडत असला तरी तो एका वर्षासाठी आहे. शाही दसरा सणाबद्दल करवीरवासियांच्या वेगळ्या भावना आहेत. त्या आम्ही जाणतो. पण कोरोनामुळे निर्माण झालेल्या असाधारण परिस्थिती नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे यंदाचा दसरा रद्द केला आहे. करवीरवासियांनी रविवारी विजयादशमी दिनी दसरा साजरा घरीच राहू साजरा करावा. कोरोनाच्या काळात आवश्यक असणाऱ्या सर्व दक्षता घ्याव्यात, आपण आणि आपले कुटुंब यांची काळजी घेताना इतरांचीही काळजी घ्या, असे आवाहन करत शाहू महाराज यांनी करवीरवासियांना दसऱयाच्या शुभेच्छा दिल्या.
तमाम करवीरवासियांसाठी शाही दसरा अविस्मरणीय, अलौकिक असा सोहळा असतो. यंदा त्यात खंड पडला असला तरी त्यामुळे आकाश कोसळणार नाही. पुढील वर्षी नव्या जोशात हा सण साजरा करू शकतो. पण यंदा मात्र प्रत्येक करवीरवासियांचे आरोग्य महत्वाचे आहे. -श्रीमंत छत्रपती शाहू महाराज