सेन्सेक्स 77 अंकांनी वधारला- अदानी सर्वाधिक नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रिज, इन्फोसिस आणि टीसीएस सारख्या मोठय़ा कंपन्यांच्या समभागांमध्ये असलेली तेजी आणि जागतिक बाजारांच्या सकारात्मक वाटचालीच्या जोरावर भारतीय शेअर बाजार आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी काहीशी तेजी नेंदवत बंद झालेला दिसला.
सोमवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 77 अंकांच्या वाढीसह 52,551.53 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 12 अंकांच्या तेजीसह 15,811.85 अंकांवर बंद झाला. भारतीय शेअर बाजारात सोमवारी विक्रीवर जोर दिसून आल्याने सुरूवातीला काहीशी नरमाई दिसून आली. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक कमकुवत दिसून आले. छोटय़ा-मोठय़ा कंपन्यांच्या निर्देशांकातही घसरण दिसली. निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 1 टक्के इतका घसरला होता. आयटी कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीमुळे बाजाराला काहीसा आधार लाभत होता. निफ्टीचा आयटी निर्देशांक अर्धा टक्का मजबुतीत व्यवहार करत होता. सकाळी सेन्सेक्सचा निर्देशांक 17 अंकांच्या वाढीसह तर निफ्टी मात्र 7 अंकांच्या घसरणीसह खुला झाला. सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजसह बजाज फायनान्स, ओएनजीसी, इन्फोसिस, पॉवरग्रिड कॉर्प, एल अँड टी आणि इंडसइंड बँक यांचे समभाग तेजीत राहिले तर दुसरीकडे कोटक बँक, एनटीपीसी, एचडीएफसी, सन फार्मा, बजाज ऑटो आणि मारूतीचे समभाग घसरणीसह बंद झाले.
अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या समभागांमध्ये वेगाने घसरण झाल्याचे दिसून आले. यांच्यातील अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 20 टक्के व अदानी पोर्ट्स ऍण्ड सोशल इकॉनॉमिक झोनचे समभाग तर 16 टक्के इतके घसरले. कंपनीत गुंतवणूक केलेल्यांची तीन विदेशी खाती गोठवली गेल्याची बातमी धडकल्याचा हा परिणाम होता. पण नंतर तसे काही झाले नसल्याचा खुलासा अदानी ग्रुपकडून देण्यात आल्यावर त्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसला.
श्याम मेटालिक्सचा आयपीओ सोमवारी खुला झाला. जागतिक बाजारात धातूचे वाढते दर व देशांतर्गत मागणी वाढीचा श्याम मेटालिक्सला फायदा होईल, असे सांगितले जात आहे. तिकडे विदेशी बाजारात जपानचा निक्केई निर्देशांक तेजीत होता तर कोरियाचा कोस्पी निर्देशांक घसरणीत होता. सुटय़ांमुळे हाँगकाँग, चीन व ऑस्ट्रेलियातील बाजार बंद असल्याचे सांगण्यात आले. युरोपिय बाजार तेजीत होते.