कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठीच्या उपायांमध्ये मास्क घालणं हा प्राथमिक उपाय आहे. घराबाहेर पडताना मास्क घालायलाच हवं. यासोबतच हात धुणं, दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर राखणं, गर्दी टाळणं असे उपायही गरजेचे आहेत. कोरोनाविरोधी लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मास्कला पर्याय नाही. मात्र मास्क घातल्यामुळे बरेच दुष्परिणाम होत आहेत. चेहर्यावर मुरूमं, पुटकुळ्या येणं, डाग पडणं अशा समस्यांसोबतच बराच काळपर्यंत मास्क घातल्यामुळे घसा खवखवण्याची समस्या उद्भवत आहे. मास्क घातल्यानंतरही घसा खवखवत असल्यामुळे अनेकांना कोरोनाच्या संसर्गाची धास्ती वाटते. मात्र अशा पद्धतीने घसा खवखवण्यामागे इतर कारणं असू शकतात. ऑफिसमध्ये किंवा बराच काळ बाहेर राहणार्यांना सतत मास्क घालावा लागतो. यामुळे मास्क खराब तर होतोच शिवाय त्यावर धूळ तसंच जंतूही चिकटतात. श्वास घेण्याच्या प्रक्रियेदरम्यान हे धुलीकण तसंच जंतू शरीरात प्रवेश करतात. यामुळे तुम्हाला ऍलर्जी होऊ शकते. परिणामी घसा खवखवू शकतो. मास्क घातल्यानंतर लोक जोरात बोलतात. यामुळेही घसा दुखून खवखवू शकतो. तुम्ही बरेच दिवस एकच मास्क वापरत असाल तर तुम्हाला घसा खवखवण्याची समस्या उद्भवू शकते. हे टाळण्यासाठी मास्क नियमितपणे धुवायला हवं. मास्क अधिक काळ वापरल्यानंतर ते गरम पाणी आणि साबणाने धुवा. त्यानंतर हे मास्क उन्हात वाळवा. तुमच्याकडे एकापेक्षा अधिक मास्क असायला हवीत. मास्कच्या बाह्यभागाला हात लावू नका. तसंच मास्क घालण्या आणि काढण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या. अशा उपाययोजनांमुळे मास्क घातल्यानंतरही तुमचा घसा खवखवणार नाही.
Previous Articleहिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर झाले क्वारंटाइन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.