नोव्हेंबरमध्ये महागाई दर वाढून 14.23 टक्के
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
घाऊक महागाई दराचा आकडा सरकार तसेच सर्वसामान्यांना झटका देणारा आहे. नोव्हेंबरमध्ये घाऊक महागाई दर 14.23 टक्क्यांवर पोहोचला. तत्पूर्वी ऑक्टोबर महिन्यात हा आकडा 12.54 टक्के राहिला होता. तर सप्टेंबरमध्ये हा दर 10.6 टक्के होता. सोमवारी कंझ्युमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई दराचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले होते. हा महागाई दर नोव्हेंबरमध्ये वाढून 4.91 टक्के झाला आहे. ऑक्टोबरमध्ये हाच दर 4.48 टक्के राहिला होता.
घाऊक महागाईचा हा दर 12 वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्याचे एका वृत्तसंस्थेने नमूद केले आहे. इंधन आणि विजेच्या दरांमध्ये वृद्धी झाल्याने घाऊक महागाईत वाढ नोंदली गेली आहे.
नोव्हेंबरमध्ये खाद्य महागाई दर ऑक्टोबर महिन्याच्या 3.06 टक्क्यांच्या तुलनेत वाढून 6.70 टक्क्यांवर पोहोचला आहे. निर्मिती उत्पादनांचा घाऊक महागाई दर ऑक्टोबर महिन्यातील 11.92 टक्क्यांवरून वाढून 12.04 टक्के झाला आहे. इंधन आणि ऊर्जेचा घाऊक महागाई दर ऑक्टोबर महिन्यात 37.18 टक्के राहिला होता. नोव्हेंबर महिन्यात हा दर 39.81 टक्क्यांवर पोहोचला आहे.
खाद्यतेलाची महागाई घटली
नोव्हेंबरमध्ये खाद्यतेलाचा घाऊक महागाई दर ऑक्टोबरच्या 32.57 टक्क्यांवरून कमी होत 23.16 टक्क्यांवर आला आहे. अंडी, मांसाचा घाऊक महागाई दर 1.98 टक्क्यांवरून वाढत 9.66 टक्क्यांवर गेला आहे. कांद्याचा घाऊक महागाई दर उणे 25.01 टक्क्यांवरून कमी होत उणे 30.14 टक्क्यांवर आला आहे. तर बटाटय़ाप्रकरणी हा दर उणे 51.32 टक्क्यांवरून उणे 49.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. दुधाचा घाऊक महागाई दर ऑक्टोबरच्या 1.68 टक्क्यांच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये 1.81 टक्के झाला आहे.
घाऊक महागाई दर म्हणजे काय?
घाऊक किंमत निर्देशांकाचा अर्थ घाऊक बाजारात एका व्यापाऱयापासून दुसरा व्यापारी वसूल करत असलेल्या किमतीशी निगडित असतो. या किमती घाऊक स्वरुपात करण्यात आलेल्या व्यवहारांशी निगडित असतात. याच्या तुलनेत ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) सर्वसामान्य ग्राहकांकडून दिल्या जाणाऱया किमतीवर आधारित असतो. सीपीआय आधारित महागाई दराला रिटेल इन्फ्लेशन किंवा किरकोळ महागाई दर म्हटले जाते.