असगणी, लोटे, घाणेखुंट ग्रामस्थांची कारवाई : आठवडाभरापासून रचला होता सापळा : टँकर ग्रामस्थांच्या अंगावर घालण्याचाही प्रयत्न : तिघे पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील आवाशीनजीकच्या नाल्यात घातक रसायन ओतणारे दोन टँकर स्थानिक ग्रामस्थांनी सोमवारी पहाटे रंगेहाथ पकडले. यावेळी दबा धरून बसलेल्या ग्रामस्थांच्या अंगावर टँकर घालण्याचाही प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी ग्रामस्थांनी तिघांना शिताफीने पकडत पोलिसांच्या ताब्यात दिले.
याप्रकरणी सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हे दोन टँकर एम.आय.डी.सी.तील योजना वनविल्ड कंपनीचे असल्याची माहिती पुढे आली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील असगणी-लवेलच्या वेशीवर अज्ञातांनी सलग तीनवेळा घातक रसायन ओतले होते. या घातक रसायनामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होऊन मासेही मृत्यूमुखी पडले होते. नजिकची झाडेदेखील जळून खाक झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी घातक रसायन ओतणाऱयांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. मात्र प्रशासनाकडून सातत्याने याकडे दुर्लक्ष होत होते.
घातक रसायन ओतण्याची पुनरावृत्ती होत राहिल्याने महामार्गावर संयुक्त गस्त सुरू केली होती. मात्र तरीदेखील घातक रसायन ओतणाऱयांचा सुगावा लागला नव्हता. या पार्श्वभूमीवर लोटे, असगणी व घाणेखुंट येथील स्थानिक ग्रामस्थांनी पहारा देत घातक रसायन ओतणाऱयांना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार सरपंच अनंत नायनाक, ईस्माइल कादरी, भरत भेकरे, सागर महाडिक, संजय मुरडे व अन्य ग्रामस्थांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास आवाशीनजीकच्या नाल्यात घातक रसायन ओतणारे दोन टँकर शिताफीने पकडले. टँकर चालकांनी ग्रामस्थांच्या अंगावर टँकर घालून पळून जाण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी हा प्रयत्न हाणून पाडत दोन्ही टँकरसह तिघांना ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. हे दोन्ही टँकर लोटे औद्योगिक वसाहतीतीलच योजना व वनविल्ड कंपनीचे असल्याचे उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घातक रसायन ओतणारे टँकर पकडल्याचे समजल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही टँकरसह तिघांना ताब्यात घेतले असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच होती.