आर्थिक विधेयकावरील चर्चेच्या वेळी गोंधळ
वृत्तसंस्था /अक्कारा
आफ्रिकेतील घाना या देशाच्या संसदेत माजलेल्या अभूतपूर्व हिंसाचार हा जगाच्या चर्चेचा विषय बनला आहे. एका आर्थिक विधेयकावरील चर्चेच्या प्रसंगी सत्ताधारी आणि विरोधी सदस्य यांनी एकमेकांशी अक्षरशः चपलांनी मारामारी केली. लाथाबुक्क्यांचाही सर्रास उपयोग करण्यात आला.
इलेक्ट्रॉनिक पेमेंट विधेयकावरील चर्चेच्या वेळी हा प्रकार घडला. विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांवर चाल केली. त्यानंतर तुंबळ रणकंदन सुरु झाले. सदस्यांनी एकमेकांचे कपडे फाडण्यासही कमी केले नाही. महिला सदस्यही या धुमश्चक्रीतून सुटल्या नाहीत. सभागृहाच्या सुरक्षा रक्षकांनी मधे पडून बेभान सदस्यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांनाही माराचा प्रसाद मिळाला.
कशामुळे मारामारी ?
इलेक्ट्रॉनिक पेमेंट विधेयकावर मतदानाच्या वेळी समसमान मते पडली. हे विधेयक संमत झाले असते तर सर्वसामान्य लोकांना ऑनलाईन पेमेंट व्यवहारांवर 1.75 टक्क्यांचा कर द्यावा लागणार होता. हा दर जनतेसाठी डोईजड आहे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे होते. मात्र सत्ताधारी सदस्यांनी त्यांना दाद दिली नाही. म्हणून ही अभूतपूर्व मारामारी झाली, असे वृत्त आहे.