पंतप्रधान मोदींची ‘कोरोना’ संबंधी सूचना, घेतला व्यापक आढावा, संशयितांच्या संख्येत वाढ पण स्थिती नियंत्रणात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चीन, दक्षिण कोरिया आणि इतर काही देशांसाठी चिंतेचे कारण बनलेल्या ‘कोरोना विषाणू’ आजाराच्या संशयित रूग्णांची संख्या भारतात काही प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे मंगळवारी केंद्र सरकारच्या उच्च अधिकाऱयांसमवेत परिस्थितीचा व्यापक आढावा घेतला. कोणीही घाबरण्याचे कारण नाही. मात्र, आरोग्यविषयक काळजी घ्यावी. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी सूचना त्यांनी नागरीकांना केली.
देशात कोरोना विषाणूबाधित रूग्णांची संख्या 6 असल्याचे सांगितले जात आहे. हे रूग्ण प्रामुख्याने आग्रा, दिल्ली आणि केरळमधील आहेत. त्यांना दक्षतेचा उपाय म्हणून वेगळे ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी चार जणांची प्रकृती सुधारत आहे. तेलंगणात सोमवारी आढळलेल्या संशयित रूग्णाचाही उपचारांना सकारात्मक प्रतिसाद आहे, असे अधिकाऱयांनी स्पष्ट केले.
आव्हानाला तोंड देण्यास सज्ज
या विषाणूचा संसर्ग देशात पसरू नये, म्हणून सर्व राज्यांच्या सहकार्याने केंद्र सरकारने व्यापक दक्षता योजना आखली आहे. सर्व जिल्हा रूग्णालयांना चोख तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. औषधांचा साठा आणि संशयित रूग्णांना वेगळे ठेवून त्यांच्यावर उपचार करण्याची व्यवस्था सज्ज ठेवण्यात येत आहे. अनेक राज्यांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
संशयितांची संख्या 24
देशभरात कोरोनाच्या संशयित रूग्णांची संख्या 20 ते 24 असल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांपैकी 12 जणांची चाचणी नकारात्मक आल्याचेही दिसून आले आहे. केवळ लक्षणे दिसून आली म्हणून त्यांच्या संदर्भात काळजी घेण्यात येत आहे. तथापि, लक्षणे दिसणे म्हणजे या विषाणूचा संसर्ग झाला आहे, असा अर्थ होत नाही, असेही दिल्लीतील डॉक्टरांनी स्पष्ट केले.
विमानांसंबंधी दक्षतेचा आदेश
चीन, जपान, इटली, दक्षिण कोरिया आणि इराण आदी देशांमधून भारतात येणाऱया प्रवासी विमानांवर अधिक लक्ष ठेवण्याचा आदेश विमानचालक संघटनेने काढला आहे. ही विमाने निर्जंतूक करण्यात यावीत. तसेच त्यातून उतरलेल्या प्रत्येक प्रवाशाची चाचणी घेण्यात यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
इटालियन प्रवाशाला आजार
इटलीहून जयपूर येथे आलेला एक इटालियन प्रवासी आणि त्याच्या पत्नीला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे मंगळवारी आढळून आले. त्यामुळे त्यांना त्वरित रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांना वेगळे ठेवून उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीला सध्यातरी कोणताही धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
इराणमध्ये 77 जणांचा मृत्यू
इराणमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 77 लोक मृत्यूमुखी पडल्याची घोषणा तेथील सरकारने केली आहे. चीननंतर इराणमध्येच या विषाणूमुळे सर्वाधिक जिवीतहानी झाली आहे. दक्षिण कोरिया व इटलीमध्येही रूग्णांची संख्या वाढत आहे. इराणमध्ये साधारणतः 1000 जणांना याची बाधा झाली आहे. अमेरिकेत 12, तर इटलीत 127 जणांवर वेगळे ठेवून उपचार करण्यात येत आहेत.