चित्रकार अरुण दाभोलकर यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
‘घुंगुरकाठी’ स्वयंसेवी संस्थेचे कार्य प्रेरणादायी असून त्याच्या अनुकरणाची गरज आहे. केवळ शासनावर अवलंबून न राहता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातूनही गावांचा विकास साधता येतो. विविध उपक्रमांमधून गावाला एकत्र आणणाऱया अशा सेवाभावी संस्थांचे जाळे निर्माण होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीचे चित्रकार अरुण दाभोलकर यांनी आडाळी येथे केले.
आडाळी येथील ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ या सेवाभावी संस्थेच्या पहिल्या वर्धापनदिन सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत, उपाध्यक्षा डॉ. सई लळीत, सहसचिव गौरीश काजरेकर उपस्थित होते. या सोहळय़ात विविध क्षेत्रातील 21 मान्यवरांचा शाल, श्रीफळ, भगवद्गीता, ‘चित्रकथी’ शैलीतील गणपतीची प्रतिमा देऊन दाभोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दाभोलकर यांच्या हस्ते संस्थेच्या पहिल्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष व संस्थापकीय मुख्य विश्वस्त सतीश लळीत यांनी स्थापनेपासून गेल्या वर्षभरात घेतलेल्या कार्याचा आढावा घेतला. तर संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. सई लळीत यांनी प्रास्ताविक केले. दरम्यान, कार्यक्रमात दाभोलकर यांच्या हस्ते मंगेश गावकर (लष्करी सेवा), शांताराम गावकर (शैक्षणिक सेवा), सगुण उर्फ बाबी गावकर (ज्येष्ठनागरिक), लक्ष्मण तथा बाबल गावकर (समाजसेवा), भगवान गावकर (नाटय़ अभिनेता, दिग्दर्शक), जयप्रकाश गावकर (समाजसेवा), पराग गावकर (पत्रकारिता, साहित्य), प्रवीण गावकर (उद्योजक), शरद पांचाळ (समाजसेवा), मंगेश परब (लष्करी सेवा), विष्णू गावकर (नौदल सेवा), संतोष गावकर (लष्करी सेवा), लक्ष्मण परब (लष्करी सेवा), राजन जंगले (निमलष्करी सेवा), चंद्रकांत सावंत (मूर्तीकार), सोनू साबाजी कदम (निमलष्करी सेवा), फ्रान्सीस उर्फ सायार फर्नांडिस (व्यावसायिक), मिताली मेस्त्राr (आशाताई), ममता नीळकंठ गावकर (अंगणवाडी ताई), ममता उदय सावंत (अंगणवाडी ताई), ‘घुंगुरकाठी भवन’ वास्तुरचनाकार मुशाहिद रझा खान यांना सन्मानित करण्यात आले.
मुख्य सोहळय़ानंतर ‘ठाकर आदिवासी लोककला आंगण, पिंगुळी’ प्रस्तुत कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम (आख्यान : सीतास्वयंवर) परशुराम गंगावणे, चेतन गंगावणे आणि मंडळी यांनी सादर केला. या बहारदार कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात कुडाळ येथील अस्थिरोगतज्ञ डॉ. योगेश नवांगुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आडाळी शाळेच्या सभागृहात घेण्यात आले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. सई लळीत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पराग गावकर, प्रवीण गावकर, राजन गावकर, संदीप उत्तम गावकर यांनी सहकार्य केले.