संगमेश्वर तालुक्यातील सर्वात‘मोठय़ा’आजींचा वाढदिवस उत्साहात
वार्ताहर / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील घोडवली गावातील गवळीवाडीमध्ये राहणाऱया आजींनी 17 फेब्रुवारी रोजी वयाची एकशेवीशी पूर्ण केली आहे. वाचून आणि सांगून विश्वास वाटणार नाही, अशा या संगमेश्वर तालुक्यातील सर्वात वयस्कर आजींचे नाव आहे, लक्ष्मी सखाराम भोजने. बुधवारी त्यांचा 120वा वाढदिवस साजरा करण्यात आला.
संगमेश्वर तालुक्यातील मुचरी गावात पार्वती मोरे या आजींचे वय 106 वर्षे आहे. त्यांच्याही पुढे जात घोडवलीतील लक्ष्मी सखाराम भोजने यांनी गुरुवारी आपल्या वयाची 120 वर्षे पूर्ण केली आहेत. लक्ष्मी भोजने यांचे माहेर संगमेश्वर तालुक्यातील चांदिवणे गवळीवाडी. घोडवली येथील सखाराम भोजने यांच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांचे नांव’ लक्ष्मी’ असे ठेवले गेले. त्या खऱया अर्थाने भोजने घराण्यात लक्ष्मी बनून आल्या. विविध कष्ट करत त्यांनी भोजने घराण्याचा उत्कर्ष केला. बालपणापासूनच शेतीची आवड असल्याने त्यांनी स्वतःला शेतीच्या कामात झोकून दिले. भातशेतीसह नाचणी, वरी, खामडीची शेती त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत अनेक वर्षे करत चांगले उत्पन्नही मिळवले. शेतकरी कुटुंब असल्याने सतत कष्ट सुरुच असल्याने त्यांच्यासह त्यांचे 4 मुलगे आणि 3 मुलोंचीही प्रकृती ठणठणीत राहिली.
पती निधनानंतर खचून न जाता, संसाराची सारी सुत्रे लक्ष्मी आजींनी स्वतःकडे घेतली आणि त्यात यशस्वीही झाल्या. मुलांना शक्य तेवढे शिक्षणही दिले. शिक्षण घेत असतांना मुलांनीही शेतीत मदत करुन आईचे हात बळकट केले. नोकरी-व्यवसायानिमित्त मुले शहराकडे गेली. मुला-मुलींची लग्ने झाल्यानंतर प्रत्येकाचा संसार सुरु झाला, नातवंडे झाली. मात्र सारे कुटुंब लक्ष्मी आजींची विचारपूस करुन त्यांना आदराची वागणूक देत आहे. मुलांकडून चार पैसे मिळू लागले लक्ष्मी आजींनी शेती थशंबविली नाही. दरम्यान त्यांच्या चार मुलग्यांपैकी दोन मुलांच्या मृत्यूलाही त्यांनी धिरोदात्तपणे तोंड दिले. या प्रसंगातही खचून न जाता लक्ष्मी आजींनी आपली कष्टप्रद वाटचाल सुरुच ठेवली. कदाचित तेच त्यांच्या निरोगी आरोग्याचे रहस्य असावे. 2010 साली ठणठणीत असलेल्या लक्ष्मी आजींचा शतकोत्सव सर्व कुटुंबियांनी जल्लोषात साजरा केला होता.
वयाची शंभरी गाठूनही लक्ष्मी घरातील कामे करतच होत्या. गेल्या पाच-सहा वर्षात वयोमानानुसार श्रवण, दृष्टी कमी होणे असे प्रकार आहेत. मात्र अजूनही स्वतःची सर्व कामे त्या स्वतः करत आहेत. क्वचित प्रसंगी उपचारासाठी दवाखान्यात जावे लागते तर कधी डॉक्टरना घरी आणावे लागते. 17 फेब्रुवारी 1901 सालचा जन्मलेल्यालक्ष्मी आजींना बुधवारी 120 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त घरातील सदस्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. सध्या माणसाच्या आयुष्यमानाचा आलेख घसरत असतांना वयाची 120 वर्षे पूर्ण करणाऱया लक्ष्मी भोजने यांचे उदाहरण नक्कीच आगळेवेगळे म्हणावे लागेल.
कष्ट हेच दीर्घायुष्याचे रहस्य !
लक्ष्मी भोजने या माझ्या आज्जेसासूबाई आहेत. त्यांनी आजवर घेतलेले कष्ट हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. त्यांच्या वयाचा पुरावाही कुटुंबाकडे आहे. अनेक आघात पेलूनही त्या ना कधी मनाने खचल्या ना शरीराने. प्रत्येकाचे हसतमुखाने स्वागत आणि आहे त्यातील दुसऱयाला देण्याची वृत्ती यामुळे त्यांना आजवर अनेकांचा ‘दुवा’ मिळाला. कदाचित यामुळेच परमेश्वरानेही त्यांना निरोगी दीर्घायुष्य दिले असावे.
– मंगेश चोगले, नातजावइ