वृत्तसंस्था /कोविलपट्टी (तामिळनाडू)
हॉकी इंडियाच्या येथे सुरू असलेल्या 11 व्या कनिष्ठ पुरूषांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चंदीगड, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि ओडिशा या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
या स्पर्धेतील झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात चंदीगडने पंजाबचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव करत शेवटच्या चार संघात स्थान मिळविले. या सामन्यात सुमीतने आठव्या मिनिटाला चंदीगडचे खाते उघडले. 22 व्या मिनिटाला सिमरनज्योत सिंगने पंजाबला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 44 व्या मिनिटाला रोहितने चंदीगडचा दुसरा गोल केला. 45 व्या मिनिटाला राजिंदर सिंगने पंजाबचा दुसरा गोल नोंदवून सामन्यात रंगत आणली. 51 व्या मिनिटाला रोहितने स्वतःचा वैयक्तिक दुसरा आणि चंदीगडचा तिसरा आणि निर्णायक गोल करून पंजाबचे आव्हान संपुष्टात आणले.
दुसऱया उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हरियाणाने तामिळनाडूचा 7-3 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत स्थान मिळविले. या सामन्यात हरियाणा संघातील दीपकने चौथ्या, 27 व्या आणि 46 व्या मिनिटाला असे तीन गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधली. अमनदीपने पाचव्या व 32 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. पंकजने 19 व्या आणि रोहितने 59 व्या मिनिटाला हरियाणातर्फे गोल नोंदविले. तामीळनाडूतर्फे एस. अरविंदकुमारने सहाव्या, बी. सतीशने 49 व्या मिनिटाला आणि अरविंदने 55 व्या मिनिटाला गोल केले.
तिसऱया उपांत्यपूर्व सामन्यात उत्तरप्रदेशने दिल्लीचा 9-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. उत्तरप्रदेश संघातील शारदानंद तिवारीने तिसऱया, 12 व्या, 22 व्या, 27 व्या आणि 51 व्या मिनिटाला असे पाच गोल केले. मनिष सहानीने 16 व्या आणि 29 व्या, कर्णधार विष्णुकांत सिंगने 43 व्या व मोहम्मद हॅरीसने 54 व्या मिनिटाला गोल नोंदविले. दिल्लीला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात ओडिशाने बिहारवर 4-1 अशी मात करून शेवटच्या चार संघांत स्थान मिळविले. या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा होता. ओडिशातर्फे अमनदीप लाक्राने 38 व्या मिनिटाला, सुशांत टोप्पोने 44 व्या मिनिटाला, सुदीप चिर्माकोने 51 व्या आणि 60 व्या मिनिटाला गोल केले. बिहारतर्फे एकमेव गोल 50 व्या मिनिटाला मोनुकुमारने नोंदविला.