शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
रेंदाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची आग्रही मागणी
वार्ताहर / हुपरी
आशिया खंडात चांदीच्या दागण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हुपरी नगरीत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे व रेंदाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावेत अशा प्रकारची आग्रही मागणी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी वर्षा या मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चंदेरी नगरी हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करून तेथील प्राथमिक आरोग्य केंद्र रेंदाळ येथे लवकरात लवकर सुरू करण्याचे निवेदन दिले.
हुपरी हे शहर औद्योगिक असून परिसरातील भागात देखील कारखाने निर्माण झाली आहेत. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होत आहे, शहरीकरण, औद्योगीकरण आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेता सर्वसोयीनियुक्त हुपरी शहरात ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे.
हुपरी परिसरात पट्टणकोडोली, रेंदाळ, रांगोळी, यळगुड, इंगळी, तळंदगे, रुई, जंगमवाडी,कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवरील ढोणेवाडी, मांगुर, बारवाड, कुन्नूर, खचनाळ, कारदगा आदी गावातील लोकसंख्या व हुपरी शहराची व्याप्ती व नगरपरिषदेत रूपांतर झालेने व्याप्ती वाढली आहे. जवळपास मोठे सुसज्ज असे रुग्णालय नाही त्यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे. तरी वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या ठिकाणी सुसज्ज असे ग्रामीण रुग्णालय होणे गरजेचे आहे. त्यामुळे परिसरातील जनतेला नवसंजीवनी मिळेल. लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय व रेंदाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभे करावेत अशा मागणीचे निवेदन कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे.
जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हुपरी परिसरातील नागरिकांच्या आरोग्य विषयाच्या सोयींसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या मागणीसंदर्भात महाराष्ट्र राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल व हुपरी परिसरातील नागरिकांचा आरोग्य सेवेचा मार्ग सुखकर होईल,असा विश्वास मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी व्यक्त केला.
यावेळी शासकीय निवासस्थानी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरूणभाई दुधवडकर, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, डॉ. सुजित मिणचेकर, गौरव नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.