महोत्सवात कलाकारांचा गौरव
प्रतिनिधी / कुडचडे
कुडचडे चंदेरी अन्न, संस्कृती व पर्यटन महोत्सव म्हणजे मनोरंजन आणि संस्कृतीचे सुरेख प्रदर्शन घडविणारा त्रिवेणी उत्सव असे प्रतिपादन कुडचडेचे पालकमंत्री निलेश काब्राल यांनी दयानंद कला केंदातर्फे आयोजित केलेल्या पाचव्या चंदेरी महोत्सवात कलाकारांच्या गौरव – कौतुक समारंभात केले.
यावेळी मुख्यमंत्री चषक अखिल गोवा फुगडी स्पर्धेत विजयी ठरलेल्या सातेरी स्वरांजली फुगडी पथकाच्या कलाकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर दयानंद केंद्राचे अध्यक्ष मोर्तु नाईक, कोषाध्यक्ष नवीन खांडेकर, सचिव बंटी उडेलकर उपस्थित होते. पुढे मंत्री काब्राल म्हणाले की, या महोत्सवात दररोज संध्याकाळी राजस्थान, गुजरात, पंजाब इत्यादी राज्यांचे कलापथके आपली पारंपरिक नृत्ये, संगीत सादर करतात. त्यामुळे चंदेरी नगरात मिनी भारत वर्षाचा माहोल तयार झालेला दिसतो. येथे आदिवासी संस्कृती, हिंदू, ख्रिश्चन, मुस्लीम बांधवांच्या सणातून दिसणारी नृत्ये, पारंपरिक गीते ऐकायला मिळतात व लुप्त होत चाललेल्या कलांचे दर्शनही घडते, असे सांगितले.
अध्यक्ष मोर्तु नाईक म्हणाले की, चंदेरी महोत्सवा सारख्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम, प्रदर्शनासाठी कुडचडय़ात मध्यवर्ती ठिकाणी मैदान असणे आवश्यक आहे, असे सांगितले.
चंदेरी महोत्सवाच्या सुरुवातीला दयानंद कला केंद्राच्या ज्येष्ठ अनुभवी कलाकार आनंदी नाईक यांच्या नेतृत्वाखाली अनिता नाईक, स्विटी तारी, काचन नाईक इत्यादींनी स्वागत गीत केली. सातेरी स्वरांजली फुगडी पथकाने बहारदार फुगडी नृत्य सादर करुन प्रेक्षकांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंटी उडेलकर यांनी केले तर नवीन खाडेकर यांनी आभार मानले.
या महोत्सवातील मनोरंजन पार्कमध्ये विविध प्रकारची साधने मुलांसाठी, लोकांसाठी असून लोक मोठय़ा प्रमाणात त्याचा आस्वाद घेत आहेत. शिवाय विविध गृहपयोगी, हस्तकला, खाद्यपदर्थांची 100 हून अधिक दालनेही थाटलेली आहेत. चंदेरी महोत्सवाला कोविड नियमांचे पालन करुन भेट देण्याचे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.