ऑनलाईन टीम / पुणे :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे यंदाचा पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार प्रख्यात वास्तुविशारद चंद्रकांतभाई सोमपुरा आणि तामिळनाडूतील हिंदू मुन्नाणी संघटनेला प्रदान केला जाणार आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
जनकल्याण समितीचे प्रांत कार्यवाह तुकाराम नाईक यांनी प्रसिद्धपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रम रविवार, 7 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या गणेश सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत.
जनकल्याण समितीतर्फे प्रदान केल्या जाणार्या या पुरस्कारासाठी दरवर्षी दोन क्षेत्र निश्चित करण्यात येतात. यंदा कलाक्षेत्रासाठी प्रख्यात वास्तुविशारद चंद्रकांतभाई सोमपुरा यांची निवड करण्यात आली आहे. गांधीनगर येथील अक्षरधाम मंदिर, सुरत आणि मुंबईतील स्वामी नारायण मंदिर, सिंगापूरमधील शिवमंदिर, बँकाकमधील विष्णू मंदिर, शिकागो आणि होस्टनमधील जैन देवघर आदि 129 मंदिरांचे निर्माते अशी सोमपुरा यांची ओळख आहे. अयोध्येतील नियोजित भव्य श्रीराम मंदिराचा आराखडाही सोमपुरा यांनी तयार केला आहे.
समाजप्रबोधन क्षेत्रातील पुरस्कारासाठी हिंदूंचे हक्क, हित आणि हिंदू मंदिरांसाठी तामिळनाडूमध्ये कार्य करणार्या हिंदू मुन्नाणी संघटनेची निवड करण्यात आली आहे. संघप्रचारक श्री. रामगोपालन उर्फ गोपालजी यांनी 1980 मध्ये या संघटनेची स्थापना केली. तामिळनाडूमध्ये धर्मांतर, गोहत्या, मंदिरांवरील शासकीय नियंत्रण आदी विरूद्ध या संघटनेने सातत्याने प्रखर संघर्ष केला आहे. तसेच रामसेतू, बेल्लोर येथील जलकंडेश्वर प्राचीन लिंगाची पुन:प्रतिष्ठापना अशा अनेक विषयात यशस्वी समाज प्रबोधन केले आहे. चेन्नईमध्ये गणेश चतुर्थी उत्सव आदि अनेक उपक्रमांची सुरुवात संघटनेने केली आहे.